Thursday, May 2, 2024
Homeनगरआठ हजार टन खत रेल्वे धक्क्यावरच पडून

आठ हजार टन खत रेल्वे धक्क्यावरच पडून

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरच्या रेल्वे मालधक्क्यावर सुमारे 8 हजार टन खत आले असताना बुधवारी सकाळी अचानक हमालांनी कामबंद सुरू केले. यामुळे ऐन पावसाच्या काळात खत मालधक्क्यावर पडून होते. महागाई भत्यासह अन्य मागण्या मान्य करूनही हमालांच्या भूमिकेमुळे अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासन व सहायक कामगार आयुक्तांनी यावर मार्ग काढून हे खत उतरून घेण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी नगर मालधक्का हुंडेकरी व वाहतूक संघटनेने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण चांगले असून शेतकर्‍यांकडून खताला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे शासनाकडून वेळोवेळी येणारे खत मालधक्क्यातून उतरून ते संबंधितांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी वाहतूक संघटना पार पाडते आहे. नगर मालधक्यावर सध्या आरसीएफ, इफको, अल्ट्राटेक सिमेंट यासह अन्य कंपनीचा माल पडून आहे. बुधवारी (दि. 1) सकाळी साडेनऊच्या सुमारास हमालांनी माल उतरण्याचे काम सुरू केले, मात्र नंतर 11 वाजण्याच्या सुमारास अचानक कामबंद करून हमाल निघून गेले. हमालांनी कामबंद करण्यापूर्वी 14 दिवसांची नोटिस देणे गरजेचे आहे. परंतु हमालांनी काहीही पूर्वकल्पना न देता कामबंद केल्याने सुमारे 1 लाख 60 हजार गोण्या (8 हजार टन) खत धक्क्यावर पडून आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे खत लवकर उतरवले नाही, तर भिजून खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माथाडी कामगार हे काम करणार नसतील तर त्वरित दुसरे कामगार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी वाहतूक संघटनेने सहायक कामगार आयुक्तांकडे केली आहे.

- Advertisement -

निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रमाकांत गाडे, कार्याध्यक्ष करीम हुंडेकरी, उपाध्यक्ष गुरविंदरसिंग वाही, भरत ठाणगे, सचिव युवराज गाडे आदींसह सभासद उपस्थित होते.

हमालांची अवाजवी मागणी

माथाडी कामगारांनी वाढीव महागाई भत्त्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात सहायक कामगार आयुक्तांकडे चर्चाही झाली. शासन नियमापेक्षा आम्ही दुप्पट महागाई भत्ता देण्यास तयार आहोत. पण कामगारांची अवाजवी 30 टक्के भत्त्याची मागणी आहे. दरम्यान सायंकाळी यावर काही प्रमाणात तोडा निघाला असून काम सुरळीत झाले असल्याचे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रमाकांत गाडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या