मुंबई / प्रतिनिधी Mumbai
राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातातील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावेत, या उद्देशाने राज्य सरकारने ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्याचे नियोजन केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी येथे दिली. अपघातानंतरचा पहिला तास, म्हणजेच ‘गोल्डन अवर’, हा जखमींच्या उपचारांच्या दृष्टीने महत्वाचा असतो. अशावेळी जखमींना तातडीने ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्यासाठी हवाई रुग्णवाहिका सेवा प्रभावी ठरू शकते, असेही सरनाईक म्हणाले.
राज्यात हवाई रुग्णवाहिका सुरु करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना सरनाईक यांनी, प्रकल्पासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करून तिला मंजुरी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती दिली. त्यानंतर नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात दरवर्षी सुमारे १५ हजार रस्ते अपघात होतात. यापैकी अनेक अपघातांमध्ये जखमींना वेळेत उपचार मिळणे हे मोठे आव्हान ठरते. विशेषतः महामार्गांवरील गंभीर अपघात, वाहतूक कोंडी, रुग्णालयापर्यंतचे अंतर आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची उपलब्धता या बाबी लक्षात घेता, अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे, असे सरनाईक म्हणाले.
समृद्धी, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गांना प्राधान्य
समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग या महत्वाच्या मार्गांवर अपघातग्रस्तांना जलद वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. या यंत्रणेअंतर्गत हवाई रुग्णवाहिका सेवेची उपलब्धता, जखमींना सुरक्षितपणे ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्याची कार्यपद्धती आणि विविध आपत्कालीन यंत्रणांमधील समन्वय यांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.
‘आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवान आपत्कालीन वैद्यकीय सेवांच्या मदतीने रस्ते अपघातांतील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याच्या नियोजनामुळे महामार्गांवरील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे’
प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री




