कर्जत |प्रतिनिधी| Karjat
तालुक्यातील निंबोडी फाटा येथे शनिवारी (दि. 14) दुपारी भरधाव इर्टिगा कारने सायकलवरून घरी जाणार्या दोन बालकांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात चैतन्य छगन उदमले (8) आणि ओंकार बापू उदमले (10, दोघे रा. निंबोडी फाटा, शितपूर, ता. कर्जत) यांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास चैतन्य आणि ओंकार शितपूर फाट्याकडून निंबोडी फाट्याकडे सायकलवरून जात होते.
श्रीगोंदा-जामखेड रस्त्यावर दशरथ बापू फुले यांच्या घरासमोर पाठीमागून आलेल्या इर्टिगा कारने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर आणि मिरजगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी घटनास्थळी भेट दिली.
भाजप नेते अशोक खेडकर यांनीही घटनास्थळी धाव घेत संतप्त ग्रामस्थांशी समन्वय साधून परिस्थिती नियंत्रणात आणली. मयत चैतन्यचे वडील छगन मारुती उदमले (36) यांच्या फिर्यादीवरून कारचालक संदीप दामोदर गोरे (रा. कपिला वस्तू बिल्डिंग, कोलबाड रोड, खोपट, ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड करीत आहेत. एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे उदमले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




