नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
एअर इंडियाचे AI-171 हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले असताना भीषण अपघात झाला. टेकऑफच्या काही सेकंदात विमान मेडिकल हॉस्टेलवर कोसळले आणि 270 लोकांचा मृत्यू झाला. विमानातील फक्त एकच प्रवासी या दुर्घटनेत वाचला. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. हे प्रकरण ताजे असतानाच आता अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज अहमदाबादहून लंडनसाठी विमानसेवा सुरू झाली होती. प्रवासी जीव मुठीत घेऊन विमानात बसले होते. पण विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे समोर आल्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान अपघातानंतर एअर इंडियाचे विमान AI 159 लंडनला रवाना होणार होते. मात्र, त्यापूर्वीच तपासणीत तांत्रिक बिघाड आढळल्याने विमान रद्द करण्यात आले. हे विमान लंडनला परत कधी जाणार, याबद्दल काहीही माहिती मिळू शकली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, टेकऑफ करण्यासाठी काही वेळ शिल्लक असतानाच हे विमान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उड्डाण घेण्याआधी विमानाची तांत्रिक तपासणी केली जाते. त्यामध्येच या विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे समोर आले. त्यामुळे मोठा धोका टळला अन् शेकडो प्रवाशांचा जीव वाचला. पण ऐनवेळी फ्लाईट रद्द झाल्याने लंडनला जाणाऱ्या अनेक प्रवाशांना विमानतळावर अडकून पडावे लागले.
हे विमान अहमदाबाद विमानतळावरून आज दुपारी १:१० वाजता टेकऑफ करणार होते. सकाळपासूनच फ्लाईटला उशीर होत होता. आता तर थेट तांत्रिक बिघाडाचे कारण सांगून विमान रद्द करण्यात आले. प्रवाश्यांना याबद्दलची माहिती एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जेन्सी लँडिंग
कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो 6E 2706 या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानाची नागपूर येथे आपत्कालीन लॅण्डिंग करण्यात आली. ही फ्लाइट सकाळी 9:20 मिनिटांनी कोचीहून रवाना झाली होती. सध्या नागपूर विमानतळावर पोलीस, बॉम्ब शोध पथक आणि अग्निशमन दल पोहोचले असून संपूर्ण विमानाची कसून तपासणी केली जात आहे. विमान सुमारे वीस मिनिटांपूर्वी नागपूर विमानतळावर उतरलं. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही, अशी प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





