Monday, June 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPawanraje Nimbalkar Case : मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष...

Pawanraje Nimbalkar Case : मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

मुंबई | Mumbai

राज्यातील राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड (Pawanraje Nimbalkar Case) प्रकरणाचा निकाल आज (शनिवारी) तब्बल २० वर्षांनी देण्यात आला. या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे. यावेळी न्यायालयाने माफीच्या साक्षीदाराच्या आधारावर सर्व आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, असे म्हटले आहे.

- Advertisement -

या प्रकरणाचा निकाल वाचनाला माजी मंत्री पद्मसिंह पाटील (Padmasinh Patil) आणि खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar) आपल्या कुटुंबियांसोबत कोर्टात हजर होते. निकालाची भिस्त माफीच्या साक्षीदारावर अवलंबून असताना त्याच्या जबाबाच्या बाबतीतच संदिग्धता आहे, माफीच्या साक्षीदाराने वारंवार साक्ष फिरवल्याने ती ग्राह्य धरता येणार नाही, असं निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवलं. विशेष सीबीआय न्यायालयाचे (CBI Court) न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी निकाल दिला.

न्यायमूर्ती काय म्हणाले?

निकाल वाचन करताना न्यायमूर्ती म्हणाले की २००२ पासून पद्मसिंह आणि पवनराजे यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली. पवनराजेंनी २००३ मध्ये आपल्या जिवाला धोका असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. आम्ही १२७ साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या. एक आरोपी पारसमल जैन माफीचा साक्षीदार झाला. खटल्याची भिस्त माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर अवलंबून आहे. साक्षीपुराव्यांमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव येथील काही जणांचा समावेश आहे. जैन यांना १५ दिवस मारहाण करुन जबाब घेतला, त्याची औषधं बंद केली, हे अयोग्य आहे. ८ सप्टेंबरला ताब्यात घेतल्यानंतर गुन्हे शाखेने जैन यांना २५ सप्टेंबरला अटक (Arrested) केली. या प्रकरणाचा तपास आणि एकूणच पाया ठिसूळ आहे. पोलिसांच्या तपासात विसंगती आहेत, असं न्यायमूर्ती म्हणाले.

पोलिसांची घोडचूक, तपासाचा पायाच ठरला ठिसूळ

न्यायालयाने (Court) निकालपत्रात नमूद केले की, सरकारी पक्षाचा हा संपूर्ण खटला माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या साक्षीवर उभा होता. मात्र, तपास यंत्रणांनी इथेच सर्वात मोठी चूक केली. गुन्हे शाखेने त्याला ८ सप्टेंबर २००९ रोजी मुंब्रा येथून ताब्यात घेतले, पण त्याची अधिकृत अटक २५ सप्टेंबर दाखवली. या दरम्यान त्याला १५ दिवस बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण करण्यात आली आणि औषधे बंद करून त्याचा कबुलीजबाब घेण्यात आला. हा पहिला जबाब कायद्याला धरून नव्हता. सरकारी पक्षाने ही माहिती न्यायालयापासून लपवून मोठी घोडचूक केली, ज्यामुळे जैनचा पुरावा संशयाच्या खाईत ढकलला गेला. त्याच्या दोन्ही जबाबांमध्ये मोठी तफावत आढळली आहे.

५० हजारांसाठी हत्या? हे पटणारे नाही

माफीच्या साक्षीदाराने पैशांच्या नडणुकीमुळे हा गुन्हा केल्याचा दावा केला होता, जो न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावला. न्यायमूर्ती म्हणाले, “साक्षीदाराचे मुंबई, नवी मुंबई, मिरा-भाईंदर येथे अनेक घरे आणि मिठाईची दुकाने आहेत. त्याच्याकडे साडेचार किलो सोन्याचे भांडवल आहे. अशा श्रीमंत पार्श्वभूमीच्या माणसाने केवळ ५० हजार रुपयांसाठी एवढी मोठी हत्या केली, हे अजिबात पटणारे नाही. त्याला सोयीनुसार खोटे बोलण्याची सवय आहे”, असे न्यायालयाने म्हटले.

तपासातील सर्वात मोठी त्रुटी: मोबाईल जप्त नाही, CDR गायब!

न्यायालयाने सीबीआय आणि पोलिसांच्या (Police) तपासातील तांत्रिक त्रुटींवर कडाडून टीका केली. तपास यंत्रणांनी डिजिटल पुराव्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. खटल्याचा तपास करताना एकाही आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला नाही.आरोपींचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) काढले गेले नाहीत. जप्ती पंचनाम्यात आरोपींच्या खिशात काय सापडले याची साधी नोंदही नाही. जर सीडीआर काढले असते, तर आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते की नाही हे स्पष्ट झाले असते.घटनाक्रमात १२ कॉल रेकॉर्डचा उल्लेख आहे, ज्यातील एक फोन पीसीओ (PCO) वरून झाला होता. पवनराजे यांना आरोपींचा थेट फोन कधी गेलाच नाही, तर मग त्यांच्या पाठलागाची आणि संवादाची ही कथा न्यायालयाने ग्राह्य कशी धरायची? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

ताज्या बातम्या

default-featured-image

Gokul Gite : मंत्री उदय सामंत नवनिर्वाचित आमदार गोकुळ गितेंना घेऊन...

0
नाशिक | Nashik नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) निकालात महायुतीला (Mahayuti) मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे...