नवी दिल्ली वृत्तसंस्था | new Delhi
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तालिबानी संघटना आणि अन्य दहशतवादी संघटनांमुळे तणावाची स्थिती आहे. यातच, पाकिस्तानने मंगळवारी रात्री अफगानिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बर्मल जिल्ह्यात हवाई हल्ला केल्याचे वृत्त आहे. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे.
पाकिस्तानी वृत्तानुसार मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडून हा हल्ला पाकिस्तानी तहरीक-ए-तालीबानचे जे दहशतवादी अफगाणिस्तानात लपून बसले आहेत, त्यांना निशाणा बनवण्यासाठी करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्नुसार मंगळवारी रात्री लामनसह सात गावांना निशाणा बनवण्यात आले. तिथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. स्थानिक वृत्तानुसार पाकिस्तानने हल्ल्यासाठी फायटर जेट्सचा वापर केला. रिपोर्टनुसार, बरमलमध्ये मुर्ग बाजार गाव नष्ट झाले. हवाई हल्ल्यात अनेक नागरिक गंभीर जखमी झालेत. या हल्ल्यात अफगाणिस्तानात मोठे नुकसान देखील झाले आहे. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हवाई हल्ल्यानंतर बदला घेण्याची शपथ
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने बर्मलवर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर बदला घेण्याची शपथ घेतली आहे. तालिबानने एका निवेदनात म्हटले आहे की, अफगाणिस्तानला आपली जमीन आणि सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या हल्ल्याचा निषेध करताना तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला की पाकिस्तानी लढाऊ विमानांनी बॉम्बफेक केलेल्या लक्ष्यांमध्ये वझिरीस्तानचे निर्वासितही होते. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या हवाई हल्ल्याला अधिकृतपणे दुजोरा दिला नसला तरी पाकिस्तानी लष्कराच्या सांगितले की, हे हवाई हल्ले सीमेजवळील तालिबानच्या ठिकाणांना लक्ष्य करून करण्यात आले.
पाकिस्तानने मंगळवारी केलेल्या हवाई हल्ल्यांत अफगाणिस्तानातील पाकिस्तानी तालिबानच्या अनेक संशयित ठिकाणांना निशाना बनवण्यात आले. त्यांचे एक ट्रेनिंग सेंटरही नष्ट करण्यात आले आहे. तसेच बंडखोरांनाही मारण्यात आले आहे. या बॉम्बिंगसाठी पाकिस्तानी जेटचा वापर करण्यात आला. आम्ही पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पक्तिका प्रांतातील काही भागांत हे हल्ले केले. त्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर अरब न्यूजला ही माहिती दिली.
अफगाणिस्तानची प्रतिक्रिया
अफगाणिस्तान संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच, या हवाई हल्ल्यांत महिला आणि लहाण मुलांसह नागरिकांना निशाणा बनवण्यात आले. “अफगाणिस्तानचे इस्लामिक अमिरात, हे आंतरराष्ट्रीय सिद्धांताच्या विरुद्ध क्रूर कृत्य मानते आणि याचा तीव्र निषेध करते,” असे मंत्रालयाने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, यापूर्वीही मार्च महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानातील सीमावर्ती भागांत तालीबानच्या ठिकानांवर हल्ला केला होता.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान ही घटना समोर आली आहे. पाकिस्तानी तालिबान किंवा तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (TTP) अलीकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये हल्ले वाढवले आहेत. तालिबान या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात आश्रय देत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. तालिबान संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला खावरजामी यांनी पाकिस्तानच्या दाव्याचे खंडन केले आहे.