संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील खंडेरायवाडी येथील एका विवाहित महिलेला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर गुरुवारी (दि.19) सकाळी तिचा मृतदेह साकूरदरा येथील खोल दरीत खून केलेल्या अवस्थेत आढळून आला. दगडाने ठेचून या महिलेचा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खंडेरायवाडी (चाचणवस्ती) येथील मनीषा रामनाथ चाचण (वय 45) ही महिला बुधवारी (दि.18) दुपारी एक वाजेच्या सुमारास गायी चारण्यासाठी रानात गेली होती. मात्र, सायंकाळ झाली तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे तिचे पती रामनाथ चाचण यांनी तिचा शोध घेतला. परंतु, ती मिळून आली नाही. अखेर पत्नी मनीषा हिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची फिर्याद त्यांनी घारगाव पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, गुरुवारी सकाळी काही तरुण साकूरदरा परिसरात गेले असता त्यांना तेथे रक्ताचे डाग दिसून आले.
यानंतर या घटनेची माहिती परिसरात पसरताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. साकूरदरा येथील खोल दरीत संबंधित महिलेचा खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, घारगावचे पोलीस निरीक्षक संदीप वर्हाडे, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ गांधले, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, रामभाऊ भुतांबरे, चांगदेव नेहे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी फॉरेन्सिक तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. खोल दरीतून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप वर्हाडे हे करीत आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.




