अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील मंगलगेट परिसरात गुरूवारी (19 नोव्हेंबर) पहाटे झालेल्या राड्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. नगरसेवक आणि माजी नगरसेवक यांच्यात पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादानंतर दोन्ही बाजूंचे समर्थक भिडल्याची घटना समोर आली. या हाणामारीत दोन्ही गटांचे कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुरूवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास कोंड्या मामा चौकातील मच्छी मार्केट परिसरात एका खासगी कार्यक्रमादरम्यान दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. सुरूवातीला बाचाबाची सुरू असलेला वाद काही वेळातच चिघळला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पहाटेच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे मंगलगेट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दोन्ही गटांचे कार्यकर्ते रूग्णालयात दाखल झाल्याने या संघर्षाची तीव्रता वाढल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात गुरूवारी सायंकाळपर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. जखमींचे रूग्णालयात जबाब नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मंगलगेट परिसरात नगरसेवक व माजी नगरसेवक यांच्यात यापूर्वी वाद झाले आहेत. पूर्ववैमनस्यातून गुरूवारी पहाटेची घटना घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.




