Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रAjay Baraskar : अजय महाराज बारस्करांचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप; म्हणाले...

Ajay Baraskar : अजय महाराज बारस्करांचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप; म्हणाले…

मुंबई । Mumbai

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पेटलेला लढा आणि अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या आंदोलनाने राज्याचे राजकारण ढवळून काढले असतानाच, आता या संपूर्ण घडामोडींवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्य सरकारने आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले खरे, परंतु या उपोषण समाप्तीनंतर उपस्थित झालेल्या अनेक संशयास्पद मुद्द्यांवरून मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांनी जरांगेंवर घणाघाती टीका केली आहे. या वक्तव्यांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

माध्यमांशी संवाद साधताना अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मनोज जरांगेंना महागडी ‘डिफेंडर’ गाडी पुरवणारा भोसले नेमका कोण आहे? आणि जरांगेंच्या मुलाकडे दोन लाख रुपयांचा मोबाईल कुठून आला?” असा थेट सवाल त्यांनी विचारला. याशिवाय, आंदोलनाच्या काळात आणि उपोषण सोडताना मंचावर उपस्थित असलेल्या व्यक्तींवरूनही त्यांनी संशय व्यक्त केला. “उपोषण सोडण्याच्या प्रसंगी तिथे अचानक बडे ठेकेदार कसे हजर राहिले? या ठेकेदारांचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी नेमका काय संबंध आहे?” असा खरमरीत प्रश्न बारस्कर यांनी उपस्थित केला.

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या वैभव कोकाटे यांच्या ट्विटचा संदर्भ देत बारस्कर म्हणाले की, जरांगेंनी उपोषण सोडले त्या ठिकाणी किशोर बलांडे हा ठेकेदार काय करत होता? बलांडे यांच्या ‘माणिक इन्फ्रा’ या कंपनीला गेल्या काही वर्षांत तब्बल ७५० कोटी रुपयांची कामे कशी मिळाली? आंदोलनात मध्यस्थी करणाऱ्या लोकांच्याच कंपन्यांना कोट्यवधींची कंत्राटे कशी मिळतात, याचे उत्तर जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिले पाहिजे. “किशोर बलांडे यांना ‘ईडी’ची (ED) नोटीस आली असावी, आणि ती कारवाई रोखण्यासाठी किंवा सौदेबाजीसाठी हे आंदोलन अचानक मागे घेण्यात आले का?” असा खळबळजनक दावाही त्यांनी केला.

मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. मग उपोषण सोडताना या हुतात्मा तरुणांच्या घरातील एकही व्यक्ती मंचावर का नव्हती? फक्त ठेकेदार आणि राजकीय नेतेच का उपस्थित होते? असा रोकडा सवाल बारस्कर यांनी केला. जरांगेंना थेट आव्हान देत ते म्हणाले, “तुमच्यात हिंमत असेल तर माझ्यासोबत खुल्या व्यासपीठावर चर्चेला या. तुमची बुद्धी आणि अभ्यासाची पातळी किती आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला दिसू द्या.”

या वादात अजय बारस्कर यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही धारेवर धरले. “मंत्री महोदय, तुम्ही तुमच्या खात्यातून बलांडेंसारख्या ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांची कामे दिली, याचे उत्तर द्या. आंदोलनादरम्यान जरांगेंनी तुमच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, शिवीगाळ केली. पण उपोषण सोडताना मात्र अचानक प्रेमाचा संदेश दिला गेला. या अचानक बदललेल्या भूमिकेमागे काय गणित आहे? विखे-पाटील साहेब, तुमचा राजकीय वारसा काय आणि तुम्ही सध्या काय करत आहात?” असा खरमरीत टोला बारस्कर यांनी लगावला.

ताज्या बातम्या

Nashik Dindori News : लखमापूरातील ओझे फिडरवरील शिवारात आता २४...

0
ओझे | विलास ढाकणे | Oze महावितरणच्या दिंडोरी उपविभागांतर्गत लखमापूर (Lakhmapur) येथील ओझे फिडरवरील शिवारातील ग्राहकांच्या १ फेज वीजपुरवठ्याचा वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता कायमस्वरूपी...