ओझे | विलास ढाकणे | Oze
महावितरणच्या दिंडोरी उपविभागांतर्गत लखमापूर (Lakhmapur) येथील ओझे फिडरवरील शिवारातील ग्राहकांच्या १ फेज वीजपुरवठ्याचा वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. लखमापूर येथून निघणाऱ्या ११ केव्ही ओझे वाहिनीवरील ग्राहकांना सुरळीत व सुरक्षित १ फेज वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी लखमापूर उपकेंद्रात एसडीटी (SDT) कार्यान्वित करण्यात आला आहे.
या तांत्रिक उपाययोजनेमुळे करंजवन, कादवा माळूंगी, ओझे आणि लखमापूर या गावांतील शिवारातील १ फेज वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ११ केव्ही ओझे वाहिनीवरील शिवारातील ग्राहकांच्या वीजपुरवठ्याबाबत निर्माण होणाऱ्या अडचणींवर आता कायमस्वरूपी तांत्रिक उपाय करण्यात आला आहे. एसडीटी कार्यान्वित झाल्यामुळे संबंधित गावांतील अधिकृत वीजग्राहकांना अधिक सुरळीत आणि सुरक्षित वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार असून, शेतकरी व ग्रामीण ग्राहकांची दीर्घकाळापासूनची वीजपुरवठ्याची समस्या दूर होण्यास हातभार लागला आहे.
अनधिकृत वीजजोडणी अधिकृत करून घेण्याचे आवाहन
दरम्यान, संबंधित गावांतील शिवारातील ज्या ग्राहकांकडे अनधिकृत वीजजोडणी अथवा अनधिकृत वीजवापर आहे, त्यांनी तातडीने आपली वीजजोडणी अधिकृत करून घ्यावी, असे महावितरणकडून आवाहन करण्यात आले आहे. अनधिकृत वीजवापर आढळल्यास नियमानुसार तपासणी व कारवाई करण्यात येऊ शकते. अनधिकृत जोडण्यांमुळे विद्युत अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी अशा प्रकारचा वीजवापर टाळावा. वीजपुरवठ्याचा वापर करताना अधिकृत वीजजोडणी, योग्य मीटर व्यवस्था आणि सुरक्षित विद्युत वापर यांचे पालन करणे आवश्यक आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश
दिंडोरी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मेघराज बागुल, सहाय्यक अभियंता, करंजवन कक्ष तसेच श्री. महेश पवार यांनी एसडीटीचे काम तातडीने पूर्ण करून संबंधित परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
या तांत्रिक उपाययोजनेमुळे लखमापूर परिसरातील ओझे फिडरवरील शिवारातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, शिवारातील अधिकृत १ फेज वीजग्राहकांसाठी वीजपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरक्षित होण्यास मदत झाली आहे.
निलेश नागरे, उपकार्यकारी अभियंता महावितरण, उपविभाग दिंडोरी




