Sunday, September 20, 2026
HomeनाशिकNashik News : एकही नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये -...

Nashik News : एकही नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

सुरगाणा तालुक्यातील कोडीपाडा येथे दिली भेट

नाशिक | Nashik

शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व शासकीय सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ नाशिक जिल्ह्यात (Nashik District) प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांच्या (Citizen) गरजा, आवश्यक कागदपत्रे आणि योजनांच्या लाभाची माहिती देण्यात यावी. एकही पात्र नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी ग्रामसेवकांनी प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रत्यक्ष पोहोचावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Aayush Prasad) यांनी केले.

- Advertisement -

सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) निसर्गरम्य कोडीपाडा येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रसाद यांनी आज सकाळी आदिवासी बांधवांशी संवाद साधला. यावेळी तहसीलदार रामजी राठोड उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांचे आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत विविध शासकीय योजना, सेवा आणि स्थानिक प्रश्नांची माहिती घेतली.

गावातील प्रत्येक नागरिकाकडे आधारकार्ड, रेशनकार्ड (Ration Card) तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे उपलब्ध आहेत किंवा नाहीत, याची माहिती घ्यावी. ज्या नागरिकांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नाहीत, त्यांना ती मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून कार्यवाही करावी. कागदपत्रे किंवा माहितीच्या अभावामुळे कोणताही नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.

महिला, युवक-युवती, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित घटक तसेच आदिवासी समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांशी जोडण्यावर विशेष भर देण्यात यावा. आरोग्य, शिक्षण, सामाजिक सुरक्षा, रोजगार, महिला व बालकल्याण यांसह विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.

गावागावांत स्थानिक कला, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. स्थानिक कलाकार, युवक व युवतींना आपली कला आणि क्रीडा कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. आदिवासी युवक-युवतींमध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय गुणवत्ता असून, त्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

‘सेवा संकल्प अभियानाच्या (Seva Sanklap Abhiyan) माध्यमातून शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट साध्य करावे. गावातील कोणताही नागरिक शासकीय सुविधा, सेवा किंवा योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते एन. डी. गावित यांच्यासह विविध विभागांचे आधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : बेकायदेशीरपणे वृक्ष तोडणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाका, खड्डे...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज (रविवारी) नाशिकमध्ये (Nashik) माध्यमांशी संवाद साधला असता दिशा सालियान प्रकरण,...