मुंबई | Mumbai
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजातील संघटना, आघाड्या, संस्था यांच्या सभा, बैठका घेत आहेत. ज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना, असे सूचक विधानही भुजबळांनी केले होते. तसेच अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही नाराजी व्यक्त केली होती. तसेच पुढील भूमिका घेण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्याचे विधानही छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना केले होते.
त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेत जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चर्चा केली. त्यामुळे छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली? या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. एकीकडे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घडत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छगन भुजबळांच्या नाराजीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या भेटीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या भेटीसंदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवारांनी हा आमचा पक्षांतर्गतला प्रश्न असल्याचे सांगितले.
काय म्हणाले अजित पवार?
छगन भुजबळ यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. ते लवकरच दिल्लीला जाणार असल्याची चर्चाही रंगली आहे, ते नाराज आहेत, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी “आमचा तो पक्षांतर्गत प्रश्न आहे. आम्ही तो प्रश्न पक्षातंर्गत सोडवू”, अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत अनेक दिवस मौन बाळगल्यानंतर अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली होती. मंत्रिमंडळात काही मान्यवरांना थांबायला सांगितले, तर काहींनी रोष व्यक्त केला. वास्तविक कधी कधी नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते. इथे संधी न देता केंद्रात संधी देण्याचा आपण विचार केलेला आहे. त्यांना योग्य मानसन्मान दिला पाहिजे, तो देण्यासाठी अजित पवार तसूभर कमी पडणार नाही. पण याबाबत गैरसमज करुन वेगळी भूमिका घेणे बरोबर नाही. राज्यात कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते.
छगन भुजबळ काय म्हणाले होते?
राज्यात ज्या घडमोडी सुरू आहेत, त्याची कल्पना आहे. मुलांना शाळांना सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि वेगळे वातावरण आहे. एक आठ ते दहा दिवस मला तुम्ही द्या. आठ ते दहा दिवसांनंतर आपण पुन्हा भेटू, बोलू. निश्चितपणे चांगला मार्ग यातून शोधू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच ओबीसी नेत्यांना विनंती करत आहे की, आम्ही यावर साधक बाधक चर्चा करत आहे. आता शांततेने घेऊया, असा निरोप दिला आहे. १० ते १२ दिवसांत जे काही चांगले करता येईल, जो मार्ग काढता येईल, तो काढूया, असे सांगितल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. ओबीसींची नाराजी दूर करावीच लागेल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.