मुंबई | Mumbai
संतोष देशमुखांची (Santosh Deshmukh) अतिशय वाईट पद्धतीने हत्या करण्यात आली, या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) म्हणाले. पण या प्रकरणात एखाद्या निष्पाप व्यक्तीला शिक्षा नको, ज्याचा संबंध नाही त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही असेही ते म्हणाले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सोमवारी अजित पवार यांची भेट घेत ही मागणी केली. तसेच राजीनामा घेतला नाही तर कोर्टात जाऊ असा इशाराही दिला आहे. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नेमके काय म्हणाले अजित पवार?
“अंजली दमानिया यांनी काही कागदपत्रे माझ्याकडे दिली, ती मी पाहिली. मी आज कॅबिनेट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटणार होतो. फोनवरुन आमचे बोलणे झाले होते, समोरासमोर बोलणे झाले होते. आज ते नागपूरला जाणार होते. त्यांनी मला चेंबरमध्ये बोलावून भेटूया असे सांगितले. त्यांनी मला सांगितले की, अंजली दमानिया मलाही भेटल्या असून काही कागदपत्रे दिली आहेत. त्यांनी सांगितले की, एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन अशा तीन चौकशा सुरु आहेत. हे पुरावे एसआयटी, सीआयडीकडे दिले आहेत. त्याबद्दलची वस्तुस्थिती काय पुढे येते त्यानुसार निर्णय घेतला जाईल,” असे अजित पवारांनी सांगितले आहे.
हे ही वाचा: Suresh Dhas: “४६ कोटी रुपयांची बिलं, १५ जेसीबी आणि १०० हायवा, अवैध राखेचे साठे…”; सुरेश धस यांचा गंभीर आरोप
दरम्यान ते पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मी आणि मुख्यमंत्र्यांनी आधीपासूनच सांगितले, जी घटना सरपंचांच्याबाबत बीड जिल्ह्यात घडली, त्याची चौकशी सुरू आहे. दोषी असतील त्यांना फाशी दिली पाहिजे, तसा प्रयत्न सुरू आहे. चौकशी चालू आहे, कुणाची आणखी नावे आली तर त्यावरही कारवाई केली जाईल. पण कुणाचा संबंधच नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही. संबंध असेल तर कुणालाही पाठीशी घालणार नाही. ही माझी, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. माझ्यावर आरोप झाले, तेव्ही मी राजीनामा दिला होता. माझी गोष्ट वेगळी होती. माझ्या वेळी जी घटना घडली होती मला ते असह्य झाले, म्हणून मी राजीनामा दिला. आता चौकशी सुरू आहे. दोषींना पाठिशी घालणार नाही, कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटी चौकशी सुरू आहे. त्यातून काय गोष्टी समोर येतात त्यावर पुढे काय करायचं हे ठरवले जाईल. पण बीडमध्ये घडलेल्या घटनेमध्ये जे कुणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही. पण ज्याचा कुणाचा संबंध समोर येईल त्याला पाठीशी घालणार नाही असे अजित पवार म्हणाले.
सुरेश धसला काय वाटते त्याच्याशी मला देणेघेणे नाही
“सुरेश धसला (Suresh Dhas) काय वाटते त्याच्याशी मला काही देणेघेणे नाही. मी सरकारमध्ये भाजपाबरोबर आहे. मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करुन महायुतीचे सरकार व्यवस्थित पुढे काम करावे असा प्रयत्न असतो. एकनाथ शिंदेंची यात महत्त्वाची भूमिका आहे. निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसून निर्णय घेतो. जर वेगवेगळ्या पक्षातील खालचे कार्यकर्ते बोलू लागले तर त्याला काही अंतच उरणार नाही. जी काही भूमिका असेल तर अमित शाह, देवेंद्र फडणवीस, जे पी नड्डा, चंद्रशेखर बावनकुळे सांगतील,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा