
पुणे | Pune
महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याबाबतचा जीआर सरकारकडून काढण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी याबाबत माहिती दिली. मात्र, सरकारच्या या निर्णयानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या मोर्च्यात ठाकरे बंधु उपस्थित राहणार असून सर्व मराठी कलाकार आणि जनता या मोर्च्यात सहभागी होणार आहे. अशात सरकार आणि हिंदी सक्ती विरोधातील या मोर्च्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केले आहे. त्यानुसार, हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर भाष्य केले. त्यानुसार, “हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. चर्चेतून चांगला मार्ग निघू शकतो. विद्यार्थी पाचवीपासून पण हिंदी शिकू शकतो. मी माझी भूमिका मांडली आहे. आज आमची कॅबिनेट आहे, तिथे त्यावर आम्ही चर्चा करू. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना भाषा शिकता यावी असे वाटत असते. मराठी ही आपली मातृभाषा आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सुद्धा आपण मराठी अनिवार्य केली आहे. आता दुसऱ्या मुद्द्यावरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत, प्रत्येक जण आपली भूमिका मांडत आहे. पहिलीमध्ये शिकणाऱ्यांना इंग्रजी आणि मराठी शिक्षण द्यावे आणि पाचवीपासून हिंदी सुरू करावी. जो मराठीमध्ये लिहायला, वाचायला शिकतो त्याला हिंदी सुद्धा लिहिता वाचता येते. मराठी शिकले की हिंदी पण येते, लिपी तीच आहे”, असे अजित पवार म्हणाले. विशेष म्हणजे “विद्यार्थी पाचवीपासून पण हिंदी शिकू शकतो”, असेही त्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर अजित पवार म्हणाले की, “कोणी कोणाला विरोध करायचा? यात आमचा काय संबंध आहे. कोणी एकत्र यावे? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, यात आपण लोकांनी नाक खुपसायचे काय कारण आहे? आपण ही त्यांना म्हटले नव्हते की वेगवेगळे व्हा, त्यांनी काय करावे, त्यांच्या त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, घटनेने सगळ्यांना अधिकार दिला आहे. मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. जेव्हा काही पक्ष एकत्र येऊन काम करतात तेव्हा मतप्रवाह असतो पण नंतर जेव्हा राज्याच्या हिताचे काय आहे? विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय आहे? या गोष्टी पहायच्या असतात.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




