Friday, October 23, 2026
Homeक्राईमKopargaon : कोपरगावात महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ

Kopargaon : कोपरगावात महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ

श्रीरामपूरच्या शाह कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण || 5 तोळ्याचे दागिने लांबवले

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon

जळगाववरून बेलापूरकडे प्रवास करणार्‍या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये घडलेल्या थरारक दरोड्याच्या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. 18 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव रेल्वे स्टेशनवर गाडी थांबलेली असताना, 6 अनोळखी दरोडेखोरांच्या टोळीने एकाच कुटुंबावर प्राणघातक हल्ला चढवत अमानुष मारहाण केली आणि 5 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून नेले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर येथील रहिवासी असलेले अक्रम रुबाब शाह हे कुटुंबातील 9 सदस्यांसह नातेवाईकाकडील बाळाच्या जन्माचा कार्यक्रम आटोपून जनरल डब्यातून प्रवास करत होते. मनमाड स्टेशन सोडल्यानंतर गाडीत चढलेल्या एका 25 वर्षीय अनोळखी इसमाने कोपरगाव स्टेशनजवळ अक्रम शाह यांच्या पुतण्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावरून झालेल्या झटापटीत अक्रम शाह मध्यस्थीसाठी गेले असता, त्या इसमाने आपल्या 5 ते 6 साथीदारांना बोलावून घेतले. आरोपींनी शेजारच्या कोचमधून आत प्रवेश करत शाह कुटुंबावर बेछूट हल्ला केला. या हल्ल्यात दरोडेखोरांनी अक्रम शाह यांच्या तोंडावर बुक्की मारल्याने त्यांचा एक दात तुटून पडला. तसेच त्यांचा 14 वर्षांचा मुलगा हसरत याच्या पायावर लाकडाने मारहाण करण्यात आली आणि पुतण्या अफजल याला बेल्टने मारहाण करण्यात आली.

मदतीसाठी धावलेल्या रुकय्या, फरिदा, महेराज, नौशाद आणि शबाना या महिला सदस्यांनाही आरोपींनी बेल्टने बेदम मारहाण केली. या गोंधळाचा फायदा घेत दरोडेखोरांनी महिलांच्या गळ्यातील 13 ग्रॅमचे नेकलेस, 25 ग्रॅमचे गंठण, 15 ग्रॅमचे दुसरे गंठण आणि 15 ग्रॅमचे सोन्याचे ब्रासलेट असा एकूण 5 तोळे 3 ग्रॅम वजनाचे दागिने ओरबाडून नेले. स्थानकावरील इतर प्रवासी व आरपीएफ पोलिसांनी तातडीने धाव घेत भांडण सोडवले. जखमींना तातडीने कोपरगाव येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाणे मनमाड येथे गुन्हा नोंद क्रमांक 0526/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 310(2), 115(2), 117(2), 118(1), 189(2), 190 आणि 191(2) नुसार 6 अनोळखी दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राखुंडे करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणूक; 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. सहकाराच्या माध्यमातून राजकीय वर्चस्व टिकविण्याची धडपड, नेत्यांमधील मतभेद आणि पडद्यामागील...