शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक शक्यता काल शिर्डीतून वर्तवण्यात आली आहे. कुप्रसिद्ध भोंदू बाबा अशोक खरात याच्या अघोरी पूजांचा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा थेट संबंध असू शकतो, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मिटकरी यांनी केलेल्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून तपासाची चक्रे आता वेगळ्या दिशेने फिरण्याची चिन्हे आहेत.
अघोरी कृत्ये आणि घातपाताचे सावट
आमदार मिटकरी यांनी खरातच्या कारनाम्यांचा पाढा वाचताना गंभीर संशय व्यक्त केला. खरातच्या आश्रमात करंगळी कापून रक्ताभिषेक करण्याचे प्रकार घडले आहेत. भिगवण रोड आणि देवगिरी बंगल्यासमोरही अमावस्येच्या रात्री अशाच अघोरी पूजा झाल्याचे समोर येत आहे. या सर्व घटनाक्रमाचा विचार करता, अजित दादांच्या विमान दुर्घटनेमागे या अघोरी शक्तींचा किंवा जाणीवपूर्वक केलेल्या कृत्याचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मिटकरी यांनी ठामपणे मांडले. या आरोपाने केवळ खरात प्रकरणच नव्हे, तर विमान दुर्घटनेच्या तपासालाही आता नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे.
येत्या 23 मार्च रोजी विधान परिषदेत या विषयावर सखोल चर्चा व्हावी, अशी आग्रही मागणी मिटकरी यांनी सभापतींकडे केली आहे. खरात प्रकरणामुळे विमान दुर्घटनेचा मुख्य मुद्दा बाजूला पडता कामा नये. या दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, हे शोधण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढणार असल्याचे सांगत मिटकरी यांनी विरोधकांनाही सूचक इशारा दिला आहे.
खरात ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता
कॅप्टन अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण करून आणि अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळिमा फासल्याची संतप्त टीका मिटकरींनी केली. हा नराधम ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याच्या तयारीत असताना सरकारने जी तत्परता दाखवली, त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. मात्र, आता हा तपास केवळ लैंगिक शोषणापुरता मर्यादित न राहता, राजकीय घातपाताच्या कोनातूनही होणे गरजेचे आहे, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.




