Friday, May 8, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमान अपघातावर व्ही के सिंगचा धक्कादायक...

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमान अपघातावर व्ही के सिंगचा धक्कादायक जबाब!

मुंबई । Mumbai

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या तपासाला आता वेग आला असून, या प्रकरणात एक अत्यंत खळबळजनक वळण मिळाले आहे. या भीषण अपघातासाठी खराब हवामान नव्हे, तर वैमानिक सुमित कपूर याची तांत्रिक चूक कारणीभूत असल्याचे प्राथमिक संकेत मिळत आहेत. व्हीएसआर (VSR) कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांनी सीआयडीसमोर (CID) नोंदवलेल्या जबाबामुळे या संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलली असून, आता तपासाची सुई वैमानिकाच्या निर्णयांकडे वळली आहे.

- Advertisement -

सीआयडीच्या विशेष पथकाने गेल्या तीन दिवसांपासून व्ही.के. सिंग यांची कसून चौकशी केली. या दीर्घ चौकशीदरम्यान सिंग यांनी अपघाताच्या वेळी नेमकी काय स्थिती होती आणि विमानात तांत्रिक स्तरावर काय घडले असावे, याचे सविस्तर तपशील दिले. सिंग यांनी आपल्या जबाबात स्पष्टपणे नमूद केले आहे की, उड्डाण करताना किंवा आपत्कालीन स्थितीत वैमानिक सुमित कपूर याच्याकडून झालेल्या चुकीच्या निर्णयामुळेच हा अपघात घडला असावा. “या अपघात प्रकरणात जर माझी काही चूक असेल किंवा कंपनीच्या स्तरावर काही त्रुटी राहिली असेल, तर मला खुशाल कठोर शिक्षा करा,” असे विधान करत सिंग यांनी तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

सीआयडी आता या प्रकरणाच्या तांत्रिक बाजूंकडे अधिक लक्ष केंद्रित करत आहे. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्ड पुन्हा एकदा बारकाईने तपासले जात आहेत. सुरुवातीला हा अपघात केवळ नैसर्गिक आपत्ती किंवा खराब हवामानामुळे झाला असावा, असा कयास होता. मात्र, आता वैमानिकाचे मागील उड्डाण रेकॉर्ड्स, त्याची त्या दिवसाची मानसिक आणि शारीरिक स्थिती, तसेच विमानाचे मेंटेनन्स यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. उड्डाण करण्यापूर्वी विमानाला तांत्रिक परवानगी (Fitness Certificate) योग्य रितीने देण्यात आली होती का, याचाही शोध आता अधिकारी घेत आहेत.

दुसरीकडे, या संवेदनशील प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे. आमदार रोहित पवार यांनी या चौकशी प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. सीआयडीने चौकशीसाठी बोलावलेल्या व्ही.के. सिंग यांना पुण्याच्या कार्यालयात चक्क ‘शाही पाहुणचार’ देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. सकाळी ११ ते रात्री ७ वाजेपर्यंत चाललेल्या या कथित चौकशीत बहुतांश वेळ सिंग यांची बडदास्त ठेवण्यातच गेला आणि रात्री त्यांना पोलिसांच्या काळ्या काचा असलेल्या गाडीतून सुरक्षित घरी सोडण्यात आले, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे तपासात काहीतरी ‘काळंबेरं’ असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून, सत्याचा सूर्य लवकरच उगवेल, असा विश्वासही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

या धक्कादायक खुलाशांनंतर आता सीआयडी वैमानिक सुमित कपूरच्या भूमिकेची अधिक खोलात जाऊन चौकशी करणार आहे. व्ही.के. सिंग यांचा जबाब आणि तांत्रिक पुरावे यांची पडताळणी केल्यानंतर या प्रकरणात लवकरच काही मोठ्या कारवाया होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात उद्योगमंत्री सामंतांचा संताप; शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरामपूर तालुका व शहर संघटनेला मोठा राजकीय धक्का बसला असून, पक्षाच्या आढावा बैठकीतच उद्योगमंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा पक्ष संपर्कप्रमुख...