बारामती | Baramati
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला सहा महिने उलटले आहेत. पण, अजूनही अपघाताच्या चौकशीचा अहवाल समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी तपास यंत्रणांवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे.
दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) हे २८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद (Zilla Parishad) निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामती येथे येत होते. त्यावेळी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात अजित पवार, वैमानिक, केबिन क्रू आणि त्यांच्या अंगरक्षकाचा मृत्यू झाला होता. दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान दुर्घटनेला सहा महिने पूर्ण झाले असतानाही चौकशीचा अहवाल अद्याप समोर न आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. “दादांना जाऊन सहा महिने झाले, पण अजूनही काहीच निष्पन्न झाले नाही याची मोठी खंत आहे,” असे सांगत युगेंद्र पवार यांनी संताप व्यक्त केला.
सहा महिने कसे गेले हे कळलेच नाही
युगेंद्र पवार म्हणाले की, “अजित दादांना जाऊन सहा महिने होत आहेत. सहा महिने कसे गेले हे कळलेच नाही. पहिल्या दिवसापासून आमच्या सगळ्यांची मागणी आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाचा पहिल्या महिन्याभरात प्राथमिक अहवाल आला, पण तो आम्हाला पटलेला नाही. त्यात अनेक मुद्दे चुकीचे आहेत.”
व्हिडीओ किंवा CCTV फुटेजही समोर आलेले नाही
अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर केंद्र व राज्य सरकारमधील अनेक बड्या नेत्यांनी आणि प्रशासनाने सखोल चौकशीची आश्वासने दिली होती. सीआयडी आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय या प्रकरणी तपास करत आहेत. मात्र, इतका काळ उलटूनही अपघाताचे साधे व्हिडीओ किंवा CCTV फुटेजही समोर आलेले नाही, असा गंभीर आरोप युगेंद्र पवारांनी केला आहे.
Nashik News: चार वर्षांचा खंड संपला! गंगापूर धरणावर महापौरांच्या हस्ते जलपूजन
कुठलीही चौकशी किंवा रिपोर्ट नाही
“आज काकांना जाऊन सहा महिने झाले, पण खंत एकाच गोष्टीची आहे की, आत्तापर्यंत सत्य जनतेच्या समोर आलेले नाही. आम्ही सर्वांनी संयम ठेवलेला आहे. आम्ही वाट बघत होतो की, दुसरा रिपोर्ट येईल, तिसरा रिपोर्ट येईल. परवा मी बातमी बघत होतो. अहमदाबाद येथे एअर इंडियाची दुर्दैवी घटना घडली. त्यालाही बराच काळ झाला, तरीदेखील आतापर्यंत कुठलीही चौकशी किंवा रिपोर्ट आपल्या सर्वांसमोर आलेला नाही. अजित दादांसारखे इतके मोठे नेते आपल्याला अचानक सोडून गेले. लोकांच्या मनात शंका आहे. लोक बोलूनदेखील दाखवतात, तरीदेखील आतापर्यंत रिपोर्ट समोर येत नाही, याची खंत युगेंद्र पवार यांनी व्यक्त केली.
आमचा सर्वांचा संयम सुटत चालला आहे
इतकी मोठी घटना घडलेली असताना देखील व्हीएसआरच्या मालकावर कारवाई होत नाही. आता आमचा सर्वांचा संयम सुटत चालला आहे. बारामतीकरांना आता सर्व उत्तरे पाहिजेत. जे काही चौकशीतून समोर येत असेल, ते तुम्ही आमच्यासमोर मांडले पाहिजे. तपास यंत्रणांना दुसरा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, अशी मागणी त्यांनी केलीय.




