नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिकेतील चार वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर आज (मंगळवारी) सकाळी गंगापूर धरण (Gangapur Dam) परिसरात महापौर हिमगौरी आहेर-आडके (Himgauri Adke Aher) यांच्या हस्ते जलपूजन (Water Workship Ceremony) करण्यात आले. सकाळी आठ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला उपमहापौर विलास शिंदे (Deputy Mayor Vilas Shinde), स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप (Standing Committee Chairman Machindra Sanap), आयुक्त मनीषा खत्री (Municpal Commissioner Manisha Khatri), सर्व गटनेते, नगरसेवक तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
यंदा जून महिन्यात एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिल्याने महापालिकेला दर शनिवारी पाणी कपात लागू करावी लागली होती. मात्र जुलैमध्ये जोरदार पाऊस झाल्याने गोदावरीला सलग दोन पूर आले आणि गंगापूर धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे प्रशासनाने शहरातील पाणी कपातीचा निर्णय मागे घेतला आहे. सध्या धरणातून चार हजार क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गंगापूर धरण भरल्यानंतर दरवर्षी महापौरांच्या हस्ते जलपूजन करण्याची परंपरा आहे. मात्र १३ मार्च २०२२ पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्याने गेली चार वर्षे ही परंपरा खंडित झाली होती. आज महापौरांच्या हस्ते जलपूजन झाल्याने ही परंपरा पुन्हा सुरू झाली आहे.




