मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळ विमान अपघातात अकाली निधन झाले. या घटनेने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली असतानाच, आता या अपघाताच्या स्वरूपावर राजकीय वर्तुळातून शंका उपस्थित केल्या जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर, अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईत एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केवळ तोंडी माहिती न देता, व्हिडिओ आणि पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अपघाताच्या दिवशीच्या घटनांचा सविस्तर तपशील मांडत अनेक खळबळजनक दावे केले.
रोहित पवार यांनी मांडलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचा प्रवास मुंबई ते बारामती असा २१० किलोमीटरचा होता, ज्यासाठी साधारण २७ मिनिटे लागणार होती. हे विमान ‘व्हिएसआर’ (VSR) नावाच्या कंपनीचे असून ते अमेरिकेत १६ वर्षांपूर्वी तयार झाले होते.
या कंपनीची देशात लेअरजेट विमानांच्या बाबतीत मक्तेदारी असल्याचा उल्लेख रोहित पवारांनी केला. प्रवासाच्या दिवशी सकाळी ७ वाजून २ मिनिटांनी क्रू मेंबर्स पोहोचले आणि बारामती विमानतळावरील हवामानाचा आढावा घेण्यात आला. ७ वाजून १० मिनिटांनी हवामान अनुकूल असल्याचा संदेश मिळाल्यानंतर, अजित पवार ७ वाजून ३० मिनिटांनी विमानात बसले आणि उड्डाण झाले.
विमानाचा प्रवास नेमका कसा झाला, याचे रेखाटन करताना रोहित पवारांनी सांगितले की, ८ वाजून २२ मिनिटांनी विमान लोणावळ्यात, ८ वाजून २५ मिनिटांनी पुण्याजवळ, तर ८ वाजून ३० मिनिटांनी यवतला होते. त्यानंतर ८ वाजून ३२ मिनिटांनी विमान सुपे परिसरात पोहोचले आणि ८ वाजून ४३ ते ८ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला.
रोहित पवारांनी विमानाचा तांत्रिक इतिहास मांडताना सांगितले की, हेच विमान २५ आणि २६ जानेवारीला सुरतला जाऊन आले होते. कंपनीचे मालक हवामानामुळे अपघात झाल्याचा दावा करत असले, तरी सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार विमानाचा आवाज वेगळा येत होता, जे मेंटेनन्समध्ये दोष असल्याचे संकेत देते.
पत्रकार परिषदेत रोहित पवार अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. “विमानात सहा लोक होते आणि पाच मृतदेह बाहेर आले, अशा चर्चांमुळे अनेकांना दादा परत येतील असे वाटत होते. आजही दादा परत आले, तर मी त्यांना घट्ट मिठी मारेन,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
मात्र, घटनास्थळी पाहलेली दृश्ये त्यांनी सर्वांसमोर मांडली. दादांचा जळालेला स्वेटर आणि त्यांच्या चपला तिथे पडल्या होत्या. अजित दादांची एक सवय होती की ते आपले घड्याळ नेहमी १५ मिनिटे पुढे ठेवायचे. अपघातानंतर सापडलेले दादांचे घड्याळ बंद पडले होते आणि त्यात बरोबर ९ वाजले होते, यावरून अपघात नेमका किती वाजता झाला असावा, याचा अंदाज येतो.
रोहित पवार यांनी या अपघाताबाबत ‘मेकॅनिकल फेल्युअर’ किंवा तांत्रिक निष्काळजीपणाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. विमान उडण्यापूर्वी त्याची रीतसर तपासणी झाली होती का, रूटीन मेंटेनन्स पूर्ण होते का, असे सवाल त्यांनी कंपनी प्रशासनाला विचारले आहेत.
सीसीटीव्हीमध्ये विमान हवेतच कलल्याचे (Tilt) दिसत असल्याने हा केवळ हवामानाचा परिणाम नसून यांत्रिक बिघाड असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेमुळे अजित पवार यांच्या निधनाचे प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर आले असून, सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.




