मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) निकालानंतर तब्बल १३ दिवसांनी आज महायुती सरकारचा आझाद मैदानावर ‘महा’शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह भाजपचे भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी ‘मी अजित आशा अनंतराव पवार ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…’ असे म्हणत अजितदादांनी शपथ घेतली. त्यांना देखील राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना उपमुख्यमंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि सहा वेळा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांची यंदाही उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सहाव्यांदा स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांनी एक नवा अध्याय रचला आहे. यावेळी त्यांच्या पत्नी आणि आई देखील उपस्थित होत्या.
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि अजितदादांचा दबदबा असताना, २००४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राष्ट्रवादीने ७८ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा अजितदादांना मुख्यमंत्री होण्याची संधी आली होती. मात्र, शरद पवार यांनी आघाडीत मंत्रिपदाची अधिक खाते मिळवण्यावर भर दिला. त्यामुळे अजितदादांची ही सधी हुकली. तसेच
अजित पवार यांची राजकीय वाटचाल अनेक मुद्यांनी गाजली. परंतु २०१२ मध्ये त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. त्यामुळे त्यांची प्रतिमा खराब झाली. २०१९ मध्ये त्यांना आणखी एक धक्का बसला, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांनी सकाळचा शपथविधी घेतला. हे सरकार पुढे ८० तासांत कोसळले. यानंतर अजितदादांनी सर्वात मोठा निर्णय घेतला आणि शरद पवार यांची २०२३ मध्ये साथ सोडली.
अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या महायुतीशी हातमिळवणी केली आणि सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांच्या हा निर्णय म्हणजे राजकीय करिअरशी खेळ असल्याचे म्हटले जात होते. यातच लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला जोराचा धक्का बसला. या निवडणुकीत अजित पवार यांना एकच जागा जिंकता आली. त्या पराभवातून सावरण्यासाठी अजितदादा थेट मैदानात उतरले आणि विधानसभा निवडणुकीत तब्बल ४७ जागांवर आपले उमेदवार निवडून आणले.
अजित पवारांचा असाही विक्रम
अजित पवार बारामतीचे आठ वेळा निवडून आलेले आमदार आणि एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा निवडणूक व्यवस्थापनातील अनुभव आणि नेतृत्वाने त्यांना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. अजित पवारांनी पहिल्यांदा १० नोव्हेंबर २०१० मध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.तर गेल्या पाच वर्षात अजित पवारांनी तीन वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.जून २०२३ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून महाविकास आघाडीतून बाहेर पडत अजित पवारांनी शपथ घेतली. त्यानंतर आज पुन्हा ०५ डिसेंबर २०२४ ला त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.