Friday, May 29, 2026
Homeदेश विदेशAjmer Murder Case : जळत्या कारमधील ४ सांगाड्यांचे रहस्य उलगडले; पोटच्या मुलानेच...

Ajmer Murder Case : जळत्या कारमधील ४ सांगाड्यांचे रहस्य उलगडले; पोटच्या मुलानेच रचला थरारक कट!

अजमेर । Ajmer

- Advertisement -

एका जळत्या कारमध्ये चार जणांचे सांगाडे सापडल्याची घटना सुरुवातीला अपघात वाटत होती, मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासांतच यामागचा एक अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक नरसंहार उघडकीस आणला आहे. हा कोणताही अपघात नसून, कौटुंबिक वादातून पोटच्या अल्पवयीन मुलानेच आई आणि बहिणीच्या मदतीने संपूर्ण कुटुंबाचा बळी घेतल्याची धक्कादायक ‘मर्डर मिस्ट्री’ राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातून समोर आली आहे.

राजस्थानमधील बोराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अराई रोडवर गुरुवारी सकाळी एका स्कॉर्पिओ गाडीला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमने वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला असता, या घटनेमागील काळे सत्य समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी मृत माजी सरपंच रामसिंह चौधरी यांची पहिली पत्नी, मुलगी आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची पाळेमुळे मृत रामसिंह चौधरी यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादात दडलेली आहेत. रामसिंह यांनी २००५ मध्ये सुनीता यांच्याशी पहिले लग्न केले होते, मात्र २०१९ मध्ये त्यांनी सुरज्ञान नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले. या दुसऱ्या लग्नानंतर घरात सतत गृहक्लेश होत असे. पहिल्या पत्नीला आणि तिच्या मुलांना घरात दुय्यम वागणूक दिली जात होती, तसेच रामसिंह दारूच्या नशेत पहिल्या पत्नीला अमानुष मारहाण करायचे. वडिलांच्या या रोजच्या त्रासाला कंटाळून मुलाने त्यांना संपवण्याचा थरारक कट रचला.

आरोपी मुलाने वडिलांच्या हत्येसाठी आधीच ऑनलाईन चाकू मागवून ठेवला होता. २७ मे रोजी घरात पुन्हा वाद झाला. त्यानंतर रात्री वडील झोपेत असताना मुलाने त्यांचा गळा चिरला. मात्र, हा प्रकार घडत असताना घरात उपस्थित असलेली सावत्र आई, आजी आणि चुलत बहीण जागी झाली. गुन्ह्याचा कोणताही पुरावा उरू नये म्हणून आरोपीने त्या तिघींचीही निर्घृण हत्या केली.

हत्याकांड घडवल्यानंतर आरोपींनी हा अपघाती मृत्यू दाखवण्यासाठी मोठा डाव रचला. त्यांनी घरातील ट्रॅक्टरमधून डिझेल काढले आणि चारही मृतदेह स्कॉर्पिओ गाडीत टाकले. घरापासून ५०० मीटर अंतरावर गाडी नेऊन ती डिझेल ओतून पेटवून दिली. त्यानंतर घरी येऊन रक्ताचे डाग पुसण्यासाठी संपूर्ण घर केमिकलने धुवून काढले.

आरोपींनी ही घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा दावा केला होता, पण फॉरेन्सिक टीमने (FSL) त्यांचा हा बनाव उधळून लावला. जळालेल्या गाडीच्या मागच्या सीट फोल्ड होत्या, ज्यावरून मृतदेह तिथे कोंबल्याचे स्पष्ट झाले. तसेच, केमिकलने धुतल्यानंतरही घराच्या भिंतींवर रक्ताचे अंश सापडले. या वैज्ञानिक आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांतच या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र जगात एआयचे नेतृत्व करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी...