Sunday, October 18, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपूरकरांची गुन्हेगारीविरोधात निर्णायक लढाईची घोषणा

Shrirampur : श्रीरामपूरकरांची गुन्हेगारीविरोधात निर्णायक लढाईची घोषणा

बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद || गुन्हेगारांचा महिनाभरात बिमोड करणार- ना. विखे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नेवासा रस्त्यावरील हॉटेल लक्ष्मीनारायण अ‍ॅन्ड लॉजिंगमध्ये आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येने श्रीरामपूर शहराला जबर धक्का बसला. अत्यंत किरकोळ कारणावरून भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडाने शहरातील वाढती गुन्हेगारी, गुंडांची वाढती दादागिरी, अवैध धंदे आणि ढासळती कायदा-सुव्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. या घटनेनंतर नागरिकांचा संताप उफाळून आला असून व्यापारी, सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेल्या श्रीरामपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

- Advertisement -

सकाळपासूनच शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठानने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. महात्मा गांधी चौकापासून पोलीस ठाण्यापर्यंत आंदोलन, घोषणाबाजी आणि ठिय्या आंदोलन करत नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष येऊन ठोस आश्वासन द्यावे, अन्यथा मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मृत आकाश दुबैया यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शहरातील गुन्हेगारीवर कठोर शब्दांत टीका करत आता गुन्हेगारांवर निर्णायक कारवाईचा इशारा दिला. त्यांच्या मते, गुन्हेगारांचे वाढलेले धाडस ही गंभीर बाब असून त्यामागे त्यांना मिळणार्‍या संरक्षणाची भावना कारणीभूत आहे. मात्र यापुढे कोणत्याही गुन्हेगाराला अथवा त्याला पाठबळ देणार्‍यांना कोणतीही सूट मिळणार नाही. राजकीय आश्रयाच्या बळावर गुन्हे करणार्‍यांनाही कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

पालकमंत्र्यांनी सांगितले की, शहरातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांसह जिल्हा पोलिस अधीक्षकांशी सविस्तर चर्चा केली आहे. येत्या एका महिन्यात शहरातील गुन्हेगारीचा विळखा मोडून काढण्यासाठी व्यापक क्लीन-अप मोहीम राबविण्यात येणार असून पोलिसांना आवश्यक ते सर्व अधिकार देण्यात आले आहेत. त्यांनी विशेषतः शहरातील अवैध धंदे, अमली पदार्थांचे जाळे आणि त्यातून गुन्हेगारीला मिळणार्‍या खतपाण्याकडे लक्ष वेधले. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांचा वापर करून गुन्हे घडवून आणणार्‍या टोळ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. वारंवार जामिनावर सुटून पुन्हा गुन्हे करणार्‍यांचे हे चक्र मोडण्यासाठी नव्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, व्यापारी संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या काही दिवसांत मारामार्‍या, गोळीबार, खून अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पोलिसांची कारवाई अपुरी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वेगाने तपास करत तीन प्रमुख आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी सुरज जाधव हा मारहाणीत जखमी झाल्याने पोलिस बंदोबस्तात उपचार घेत आहे. नंतर निलेश उर्फ यश उर्फ फडे संदीप जाधव (वय 20 रा. सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं 7), ओंकार प्रकाश डफळ (वय 20, रा-आनंदी बाजार, धनगर गल्ली) यांना तत्काळ अटक करण्यात आली.

आकाश दुबैया हत्या प्रकरणाने श्रीरामपूरमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी आणला आहे. सरकारने कठोर कारवाईची घोषणा केली असली तरी नागरिकांच्या दृष्टीने आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष परिणाम महत्त्वाचे आहेत. प्रस्तावित क्लीन-अप मोहीम शहरातील गुन्हेगारीवर किती प्रभावी ठरते, यावरच प्रशासनावरील जनतेचा विश्वास अवलंबून राहणार आहे.

ठिय्या प्रसंगी आमदार हेमंत ओगले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन गुजर, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी नगराध्यक्ष संजय फंड, मार्केट कमिटी सभापती सुधीर नवले, शहर भाजपा अध्यक्ष जितेंद्र छाजेड, प्रकाश चित्ते, श्रीरामपूर मर्चंट अध्यक्ष प्रवीण गुलाटी, गौतम उपाध्ये, मुन्ना झंवर, नगरसेवक संतोष कांबळे, अशोकचे संचालक निरज मुरकुटे, शुभम वाघ, माजी जि.प. सदस्य बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख, मुन्ना पठाण, नगरसेवक आशिष धनवटे, पाणीपुरवठा समिती सभापती योगेश जाधव, नगरसेविका वैशाली चव्हाण, नगरसेवक दीपक चव्हाण, नगरसेवक संजय गांगड, सिद्धार्थ फंड, लकी सेठी, नागेश सावंत, सुरेश कांगुणे, सरपंच सचिन मुरकुटे, लखन भगत, अशोक थोरे, सचिन बडदे, मनसे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, निलेश भालेराव, रमादेवी धीवर, केतन खोरे, भीमा बागुल, सुभाष त्रिभुवन, तिलक डुंगरवाल, संदीप मगर आदींसह नागरिक उपस्थित होते.

ठोस आश्वासन मिळेपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या
आकाश दुबैय्या हत्या प्रकरणातील आरोपींविरुध्द कठोरात कठोर कारवाई करण्यात येऊन त्यांना मकोका लावण्यात यावा, शहरातील संघटीत गुन्हेगारी संपुष्टात आणावी, याबाबत ठोस आश्वासन मिळेपर्यंत दुबैय्या कुटुंबिय, नातेवाईक यांच्यासह सामाजिक संघटना, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी तसेच नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकाश दुबैय्या यांचा मृतदेह ठेऊन ठिय्या मांडला, जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून ठोस आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, असा पावित्रा त्यांना घेतला होता.

आरोपींना 16 पर्यंत पोलीस कोठडी
आकाश दुबैय्या हत्या प्रकरणातील आरोपींविरुध्द शहर पोलीस ठाण्यात बीएनएसचे कलम 103(1), 109(1), 324(2), 351(2), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन, त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दि. 16 जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

प्रमुख आरोपींविरुध्द कारवाई होत नाही, तोपर्यंत बेमुदत बंदच, बुधवारी मोर्चा
आकाश दुबैय्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींविरुध्द कारवाई करण्यात येत नाही, तोपर्यंत श्रीरामपूर शहर बेमुदत बंदच ठेवण्यात येणार आहे. तसेच बुधवारी सर्वपक्षियांच्या मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकणार आहे.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...