मुंबई | Mumbai
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी घातलेल्या राड्यानंतर बंद करण्यात आलेले आकाशवाणी आमदार निवास येथील उपहारगृह (कँटीन) आजपासून (मंगळवार) पुन्हा सुरु करण्यात आले आहे. अजंता केटरर्स यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व अटींची पूर्तता केल्यानतंर उपहारगृह सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, ही परवानगी इतक्या तातडीने कशी मिळाली? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
गेल्या आठवड्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी टॉवेल बनियानवर कँन्टीनमध्ये येत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याची तक्रार करत तेथील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनात ही उमटले. त्यानंतर आमदार गायकवाड यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्याकडून निरीक्षण करण्यात आले होते. एफडीएच्या तपासणीत कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा अभाव आढळून आल्यामुळे अजंता केटरर्सचे लायसन्स रद्द करण्यात आले होते. यामुळे कॅन्टीनची सेवा तत्काळ बंद करण्यात आली होती.
लगेच परवानगी मिळतेच कशी?
अजंता केटरर्सने पुन्हा एकदा आज सकाळपासून कॅन्टीन सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात व्यवस्थापकांनी सांगितले असता आम्हाला परवानगी मिळाली असून कॅन्टीन आज सकाळपासून पुन्हा सुरू केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, एवढ्या कमी वेळातच परवानगी कशी मिळाली? असा सवाल उपस्थित होत आहे.
आमदार अमोल मिटकरींकडून मागणी
आमदार निवासातील उपहारगृहांचे कंत्राट हे परप्रांतियांना कसे काय मिळते. मराठी माणसाला किंवा महाराष्ट्रातील महिला बचत गटांना हे उपहारगृह चालवण्यास मिळाले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
नेमके काय प्रकार घडला?
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी गेल्या आठवड्यात आमदार निवास कॅन्टीनमधून जेवण मागवले होते. वरण आणि भाताचा पहिला घास खाल्यावरच त्यांना ते खराब असल्याचे लक्षात आले. त्याच संतापात त्यांनी खाली कॅन्टिनमध्ये जात ‘मला विष खायला घालतो का’ असे विचारत कर्मचाऱ्याला ठोसे मारत मारहाण केली. प्लास्टिकच्या पिशवीत असलेल्या डाळीला वास येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचा वास घ्यायला लावला आणि मारहाण केली होती. यानंतर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





