सातपूर | प्रतिनिधी | Satpur
सातपूर गावातील (Satpur Goan) रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा आणखी एक बळी गेल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. खड्ड्यांमधून (Potholes) वाट काढताना अपघात (Accident) होऊन गंभीर जखमी झालेले भाजी विक्रेते दिलीप दामोधर काळे यांची तब्बल २५ दिवसांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. उपचारादरम्यान काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूमुळे सातपूर परिसरात (Satpur Area) हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
दिलीप काळे हे भाजी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. भाजी खरेदीसाठी सकाळी घराबाहेर पडले असताना विक्टर गॅस्केट चौफुली परिसरात रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढत असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात (Accident) ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर गेल्या २५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ते कोमात असल्याने कुटुंबीयांची आशा मावळत चालली होती. अखेर काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले , एक मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, दिलीप काळे (Dilip Kale) यांच्या मृत्यूमुळे रस्त्यांवरील खड्डे हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून तो नागरिकांच्या जीविताशी संबंधित गंभीर प्रश्न बनला आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन रस्त्यांच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने पाहणार, असा सवाल संतप्त नागरिकांकडून (Citizen) उपस्थित केला जात आहे.
शासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा बळी?
सातपूर परिसरातील (Satpur Area) रस्त्यांवरील खड्डे, सुरू असलेली कामे आणि वाहतुकीचे अपुरे नियोजन यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. अनेकदा तक्रारी, निवेदने आणि आंदोलने करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दिलीप काळे यांच्यावर २५ दिवस उपचार सुरू असतानाही प्रशासनाकडून त्यांच्या दर्जेदार उपचारासाठी कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाने प्रयत्न केले असता तर दिलीप काळे वाचले असते अशी भावना त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
उपचाराचा खर्च; कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न
दिलीप काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. उपचारादरम्यान मोठा खर्च झाल्याने आर्थिक अडचणी वाढल्या असून, आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे एका कुटुंबावर हा प्रसंग ओढावल्याचा आरोप काळे कुटुंबीयांनी (Family) केला आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांचे भाऊ गौतम दामोधर काळे यांनी केली आहे.या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तेयांनी केली आहे. “रस्त्यावरील खड्डे आणि धोकादायक परिस्थितीबाबत प्रशासनाला वारंवार सांगूनही उपाययोजना करण्यात आली नाही. माझ्या भावाचा जीव गेला, आता तरी प्रशासनाने जागे व्हावे,” अशी संतप्त प्रतिक्रिया दिलीप काळे यांचे बंधू गौतम काळे यांनी व्यक्त केली.




