अकोले | Akole
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अकोले तालुक्यात यावर्षी प्रथमच मोठी चुरस पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गजांनी जिल्हा बँकेसाठी कंबर कसली असून हातही सैल सोडल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावर्षीची निवडणूक तालुक्यात चांगलीच गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्हा सहकारी बँकेच्या राजकारणात तालुक्याला नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण स्थान मिळत आले आहे. ज्येष्ठ नेते स्व. भाऊसाहेब हांडे दीर्घकाळ जिल्हा बँकेचे संचालक होते. बँकेचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या पश्चात त्यांचे शिष्य व बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर गेल्या पंचवीस वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून निवडून येत आहेत. मागील निवडणुकीत तर त्यांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र तालुक्याच्या बदलत्या राजकारणामुळे आता त्यांच्या वर्चस्वाला अनेकांनी आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. मात्र तरीही सोसायटी मतदारसंघात झालेल्या ठरावांमध्ये त्यांनाच मानणार्या कार्यकर्त्यांची संख्या सर्वात जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
ज्येष्ठ नेते गायकर यांच्या प्रमाणेच आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड यांनीही जिल्हा बँकेच्या राजकारणात विशेष लक्ष घातले आहे. त्यामुळे आजी-माजी आमदारांना मानणार्या कार्यकर्त्यांचेही ठराव लक्षणीय प्रमाणात झाल्याचे दिसत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे, बँकेचे मावळते संचालक अमित भांगरे, तज्ज्ञ संचालक व ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांचाही सक्रिय सहभाग असल्याचे दिसत आहे. तांत्रिक कारणामुळे ज्येष्ठ नेते गायकर यांना यावेळेला निवडणुकीला उभे राहता येणार नाही. मात्र त्यांची कन्या संजीवनी गोविंद शिंदे यांचा उंचखडक खुर्द सोसायटीमधून तर त्यांची पत्नी भीमाबाई सीताराम गायकर यांचा मोग्रस सोसायटीमधून ठराव झालेला आहे. या दोघींपैकी कुणीतरी एक गायकर यांचे बँकेमध्ये वारस असण्याची शक्यता आहे.
आमदार लहामटे प्रथमच सहकाराच्या राजकारणात प्रवेश करत आहेत. कोथळे सोसायटीमधून त्यांच्या नावाचा ठराव झाला आहे. तर बँकेचे यापूर्वी संचालक पद भूषविलेले माजी आमदार वैभव पिचड यांचा सुगाव बुद्रुक सोसायटीमधून ठराव करण्यात आलेला आहे. माजी संचालक अमित भांगरे यांचा शेंडी सोसायटीमधून तर तज्ज्ञ संचालक ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांचा अकोले सोसायटीमधून ठराव करण्यात आला आहे. कळस बुद्रुक सोसायटीतून कैलास वाकचौरे यांचा तर धामणगाव आवारी सोसायटीतून बाळासाहेब भोर यांचा ठराव झाला आहे. ज्येष्ठ नेते पर्बत नाईकवाडी यांच्या पत्नी जयश्री नाईकवाडी यांचा गर्दणी सोसायटीतून ठराव झाला आहे. अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांचा वीरगाव सोसायटीतून ठराव झालेला आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी (अंभोळ), शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुरेश गडाख (कळस खुर्द) यांचेही ठराव झालेले आहेत. हे सर्वजण उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. यापैकी काहींचे सोसायटी मतदारसंघाबरोबरच दूध प्रक्रिया तसेच पतसंस्था मतदारसंघातही ठराव झालेले आहेत.
जिल्हा बँकेसाठी कोणत्या दोन गटांत लढत होते त्यावर अकोल्यातील कोण कोणाची साथ करणार हे अवलंबून आहे. बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, माजी आमदार वैभव पिचड, कैलास वाकचौरे हे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचे समर्थन करण्याची शक्यता आहे. तर आमदार डॉ. किरण लहामटे हे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे पॅनल झाल्यास त्या पॅनलमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. मावळते तज्ज्ञ संचालक व ज्येष्ठ नेते मधुकर नवले हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निष्ठावान कार्यकर्ते असल्यामुळे ते त्यांच्या बरोबरच राहतील. अंतिम लढतीत तालुक्यातील कोणकोणते नेते कोणाबरोबर एकत्रित येणार यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. सोसायटी मतदारसंघात असलेली चुरस लक्षात घेता तालुक्यातील काही जणांना महिला राखीव व अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ यामधूनही संधी मिळणार आहे. एकूणच जिल्हा बँकेची यावेळेची निवडणूक लक्षणीय ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.




