अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सात ते आठ वर्षापूर्वी अकोले पंचायत समितीच्या आरोग्य विभागात तीन लिपिक व लेखा विभागातील कर्मचार्यांनी मिळून 2 कोटीहून अधिक रक्कमेचा अपहार केला आहे. तर 4 कोटींपेक्षा अधिकच्या खर्चाची कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून दिलेली नाही. अशा प्रकारे या ठिकाणी सहा कोटी रुपयांची गडबड झाल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. या प्रकरणात ज्या कर्मचार्याला या कोट्यावधी रुपयांच्या ‘गडबडीत’ वाटा मिळाला नाही, त्यानेच गडबड करणार्यांचा ‘काटा’ काढला असल्याचे माहिती हाती आली आहे.
गेल्या एक ते दीड महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या वर्तुळात अकोले पंचायत समितीच्या आरोग्य विभागात झालेल्या घोटाळ्याची खमंग चर्चा सुरू आहे. या ठिकाणी झालेल्या गैरव्यवहारच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाच्यावतीने संगमनेर पंचायत समितीच्या सहाय्यक लेखाधिकारी यांच्यासह चौघांचे चौकशी पथक नेमण्यात आले. अकोले पंचायत समितीच्या आरोग्य विभागात सात ते आठ वर्षापूर्वी तीन लिपकांसह लेखा विभागातील कर्मचार्यांनी स्वत:च्या नावासह काही आरोग्य सेवकांच्या नावे कोटवधी रुपयांचा निधी वर्ग केला. या प्रकरणात वाटा न मिळालेल्यांनी संतप्त होत या प्रकाराला वाचा फोडली असल्याची माहिती आता समोर येत आहे.
या प्रकरणात सुरूवातीला चौकशी समितीने पंचायत समितीच्या तिघा लिपकांसह लेखा विभागातील कर्मचार्याला दोषी धरले होते. मात्र, या प्रकरणात ज्या आरोग्य सेवक आणि अन्य कर्मचार्यांचा नावे कोटवधी रुपये जमा करण्यात आले, त्यांचा देखील यात सहभाग तितकाच असल्याने त्यांना देखील दोषी धरण्यात येणार आहे. यामुळे या गडबडीच्या प्रकाराच्या चौकशीसाठी आणखी वेळ वाढवून देण्यात आला.
आता ही चौकशी अंतिम टप्प्यात असून संबंधीतांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून नोटीस काढण्यात येणार आहे. प्रथमदर्शनी या प्रकरणात 2 ते सव्वा दोन कोटीचा थेट अपहार झालेला आहे. उर्वरित चार कोटींच्या हिशोब आणि त्याबाबतीच कागदपत्रे चौकशी समितीला उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. यामुळे ही रक्कम देखील एका प्रकारे अपहारात धरण्यात येणार असल्याचे चौकशी समितीच्यावतीने सांगण्यात आले.
पुढील आठवड्यात कारवाई
दरम्यान, अकोले पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कोट्यावधी रुपयांच्या या घोटाळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी हे पुढील आठवड्यात अॅक्शन मोडवर येणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या कामात अनियमितता असल्याची चर्चा असून मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी त्याकडे लक्ष देणार का? हा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.
मुख्यालयातील दुरूस्ती घोटाळा चौकशीच्या फेर्यात
अकोले पंचायत समिती प्रमाणे आता जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितीच्या कामाची चौकशीसह मुख्यालयातील अनेक विभागातील योजनांच्या कामांची चौकशीची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सध्या लाखो रुपयांचा दुरूस्ती घोटाळा सध्या चौकशीच्या फेर्यातून एक महिन्यांपेक्षा अधिक काळापासून या प्रकरणाची चौकशी अद्याप पूर्ण होवू शकलेली नाही.





