Monday, April 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूज‘पदवीबरोबरच कौशल्यही महत्त्वाचे; उद्योजक होता‍ंना रतन टाटांचा आदर्श ठेवा’ – उपराष्ट्रपती सी....

‘पदवीबरोबरच कौशल्यही महत्त्वाचे; उद्योजक होता‍ंना रतन टाटांचा आदर्श ठेवा’ – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

- Advertisement -

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक आहे. आजच्या काळात तांत्रिक ज्ञानासोबतच सॉफ्ट स्किल्स आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता असणे ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते. उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा. नफा मिळवण्यासोबतच सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी, याचे टाटा हे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही समाजाची, राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती असते, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा लोकभवन येथील दरबारहॉल येथे पार पडला, त्यावेळी या कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ.अमित सैनी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.सतीश सुर्यवंशी यासह, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे विद्यार्थी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन म्हणाले की, विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षान्त समारंभातील पदवीधर हे इतिहासाचा भाग बनले आहेत. या विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यश मिळवले नसून, हे विद्यार्थी भारताला ‘ग्लोबल स्किल हब’ बनवण्याच्या प्रवासात एक मैलाचा दगड रोवणार आहेत. उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ग्रीन एनर्जी आणि डेटा अ‍‍ॅनालिटिक्स यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश करून विद्यार्थ्यांना जागतिक आव्हानांसाठी तयार केले पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानंतर नैसर्गिक संसाधने नसतानाही जपानने केलेली प्रगती ही त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि शिस्तीमुळे आहे. काम करताना जपानी लोक कधीही विचलित होत नाहीत. हीच कामाप्रती निष्ठा भारतीय तरुणांनी अंगीकारली पाहिजे, असेही ते म्हणाले.

‘एआय लिविंग लॅब’मधून विद्यार्थ्यांना उद्योगातील समस्यांवर प्रशिक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘एआय लिविंग लॅब’ उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, जे भविष्यातील कौशल्याधारित अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.ते म्हणाले की, देशाचा ‘डेमोग्राफिक डिविडंड’ सक्षम करण्यासाठी तरुणांना शिक्षणासोबत कौशल्यांची जोड आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्किल इंडिया’ उपक्रमाचा उल्लेख करत त्यांनी महाराष्ट्र या क्षेत्रात आघाडीवर असल्याचे सांगितले. Ratan Tata Maharashtra State Skill University मार्फत ‘एआय लिविंग लॅब’सारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग अनुभव दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच Microsoft च्या सहकार्याने १० हजार महिलांना एआय प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती दिली.

राज्यातील गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, देशातील थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा ३१% वाटा आहे. राज्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, आगामी काळात ती जागतिक स्तरावर आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कौशल्य विकास हा आत्मनिर्भर भारताचा कणा – मंत्री मंगलप्रभात लोढा

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्याचे काम सुरू आहे. प्राचीन काळी भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटले जायचे, त्यामागे केवळ कृषी नव्हे तर प्रत्येक घरातील कौशल्य ही मोठी ताकद होती. प्रत्येक कुटुंबातून सूक्ष्म उद्योग उभे राहत होते. हीच परंपरा पुन्हा जोपासण्याची गरज आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासन मजबूत असून, आता कौशल्य क्षेत्रात आणखी प्रगती करण्यावर भर दिला जात आहे. उपराष्ट्रपतींच्या हस्ते पहिला दीक्षांत समारंभ पार पडणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. यामुळे त्यांच्या करिअरला अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वर्गीय रतन टाटा यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या या विद्यापीठातून केवळ तांत्रिक शिक्षणच नव्हे, तर मूल्यांचीही जपणूक होईल. स्वर्गीय जयंतराव सहस्त्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या प्रदर्शन कक्षाचा उल्लेख करत, कौशल्य, नवोपक्रम आणि रोजगार निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्वोत्तम आयटीआय संस्थांचा गौरव करण्यात येत असून, आदिवासी, महिला आणि सर्वसाधारण गटातील प्रत्येकी एक उत्कृष्ट आयटीआयची निवड करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कौशल्यामुळेच तरुणांचे भविष्य उज्ज्वल होईल आणि महाराष्ट्र कौशल्य क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थानी पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

Nashik NDCC Bank News : कर्जमाफीच्या अपेक्षेने वसुली कोलमडली; शेतकरी जिल्हा...

0
नाशिक | विजय गिते | Nashik राज्य शासनाकडून कर्जमाफीची (Loan Waiver) घोषणा होईल, या केवळ 'अपेक्षेपोटी' जिल्ह्यातील चालू कर्जदारांनी आपली थकबाकी भरण्याकडे पाठ फिरवली आहे....