वृक्षारोपणाविषयी जागरुकता वाढत आहे. निमित्ताने लोकं झाडे लावू लागली आहेत. अनेक सामाजिक संस्था वृक्षारोपणासाठी पुढाकार घेताना आढळतात. पण कोणतेही झाड कुठेही लावून चालत नाही. त्याचेही काही नियम असतात. कोणती झाडे कुठे लावावीत यामागे काही तर्क असतात.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणजेच काय तर झाडे आपली मित्र. हो खरेच, वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. वृक्ष केवळ आपलेच जीवन प्रभावित करतात असे नव्हे, ते तर आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात. प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करणारा वृक्ष आजही मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वाच्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावत आहे. मानवाला त्याच्या दैनंदिन जीवनात गरजेच्या सर्व गोष्टी अगदी निरपेक्ष हेतूने वृक्ष देतात. वृक्षांपासून आपणास अन्नधान्यापासून ते घरसजावटीसाठी लागणार्या वस्तू सर्व काही मिळते.
सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे. ते म्हणजे प्राणवायू. प्राणवायू श्वास घेऊन आपण कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो. हाच कार्बन डायऑक्साइड वृक्ष शोषून घेतात व आपणाला आवश्यक असणारा प्राणवायू ते सोडतात. या सर्व गोष्टी केव्हा सहज आपल्याला मिळतील तर त्या वृक्षारोपण आतापासूनच केले तर? वृक्षारोपण हे सरकारचेही काम आहे, त्यांच्याकडे यंत्रणा आहे. पण तरी सुजाण नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची काहीच जबाबदारी नाही का? राज्य सरकारही जबाबदारी पार पाडत आहे.
नाशिक जिल्ह्याचाच विचार करायचा म्हटला तर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 515 ग्रामपंचायतींच्या हद्दीत विविध 349 यंत्रणेच्या माध्यमातून वृक्ष लागवड केली जात आहे. तसेच, 1217 ग्रामपंचायत हद्दीत विविध 3,718 यंत्रणा यांच्या माध्यमातून फळबाग लागवड केली जात आहे. यामध्ये 1) साग 2) चंदन 3) खाया 4) बांबू 5) निम 6) चारोळी 7) महोगनी 8) आवळा 9) हिरडा 10) बेहडा 11) अर्जुन 12) सीताफळ 13) चिंच 14) जांभूळ 15) बाभूळ 16) अंजन 17) बिबा 18) खैर 19) आंबा 20) काजू (रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी) 21) फणस 22) ताङ 23) शिंदी 24) सुरु 25 ) शिवण 26) शेवगा 27) हादगा 28) कडीपत्ता 29) महारुख 30) मैजियम 31) मेलिया डुबिया इ.झाडांचा समावेश आहे.
वने ही पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जेवढी महत्वाची आहेत, तेवढीच माणसाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहेत. शुद्ध हवेपासून ते वन उपजांपर्यंत विविधांगांनी वने ही माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी जोडली गेली आहेत. त्यामुळे वृक्षारोपण, वनांची निर्मिती, वनसंरक्षण आणि संवर्धन या तिन्हीं गोष्टी महत्वाच्या आहेत. वने ही माणसाला मिळालेली एक नैसर्गिक संपदा आहे.
वनांचे पुनरुज्जीवन करणे शक्य आहे. त्यासाठी आवश्यक आहे, उत्तम व्यवस्थापन. वने ही प्रामुख्याने जमीन, वनस्पती, झाडे, प्राणी, सूक्ष्म जीवजंतू यांनी बनलेली असतात. वनातील हे घटक एकमेकांना पूरक स्वरुपाचे काम करतात. त्यामुळे सजीवसृष्टीचा समातोल राखण्यास मदत होते. यापैकी कुठल्याही एका घटकात बदल झाला तर पर्यावरणाची साखळी विस्कळीत होते.
वृक्षांपासून आपणास अन्नधान्य, भाजीपाला, फळे, औषधी, इंधन, इमारती लाकूड आदी प्राप्त होते. भूमी आणि जलसंरक्षणाचे काम वृक्ष करतात. पाण्याचा दुष्काळ, पूर नियंत्रण, जमिनींची धूप या गोष्टी रोखण्यासाठी वृक्षच मदत करतात. जमिनींचा ओलसरपणा टिकून राहण्यासाठी वृक्षांचा उपयोग होतो. हिमालयाच्या पर्वतीय भागात देवदार, बांबू, साल, साग इत्यादी वृक्ष आढळतात. अशा वृक्षांपासून आपल्याला इमारती, जहाजे इ. साठी लाकूड मिळते. तसेच निसर्गाचा समतोलही राखला जातो.
औषधे तयार करण्यासाठी वृक्षांची फुले, फळे, साल, पाने, मुळे, बिया या सर्वांचा उपयोग केला जातो. स्वादिष्ट फळे, सुगंधित फुले, वस्त्र, इंधन, घर यासाठी मानव आजही वृक्षांवरच अवलंबून आहे. वृक्ष व पशूपक्षी हे परस्पर पर्यायी आहेत. जिथे वृक्षांची हिरवीगार वनराई असते तेथेच पक्ष्यांचा किलबिलाट असतो. फक्त मनुष्याला नाही तर अनेक वन्य जीवांकरता पण वृक्ष फार महत्वाचे काम करते.
वन धोरणानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के भौगोलिक क्षेत्र वन वृक्षाच्छादित असणे गरजेचे असताना राज्यात हे प्रमाण साधारण 20 टक्के आहे. भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वातील कलम 48 अ नुसार नैसर्गिक संसाधनाच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी राज्यावर सोपविण्यात आली आहे.
या कार्यात नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी आणि वनाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. केवळ वृक्षारोपण न करता वृक्ष संवर्धनाच्या प्रयत्नांकडे देखील विशेष लक्ष देण्यात येत असून या सर्व कार्यात शालेय विद्यार्थ्यांपासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत सर्व घटकांना सहभागी करून घेतल्याने वृक्षारोपणाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
झाडाची लागवड कशी करावी ?
पावसाळ्यात प्रत्येकाला एक तरी झाड लावण्याची इच्छा असते. अशा वेळी पुन्हा एकदा प्रश्न पडतो की, झाडाची लागवड कशी करायची? याबाबत कृषी अधिकारी नयन पाटील यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे:60 सें.मी. बाय 60 सें.मी.बाय 60 सें.मी. या आकाराचा खड्डा करा. या खड्ड्यातील सर्व माती व दगडगोटे बाजूला वेगवेगळी काढा. प्लास्टिकच्या पिशवीतील रोपांच्या मुळांच्या उंची एवढा खड्डा मोकळा ठेवून खालील भाग 50% गाळाची माती व 50% शेणखताने भरून घ्या. 5 सें.मी. वर गोलाकार बुडाचे घेर कापावा. नंतर उभे कापावे.
प्लास्टिकच्या पिशवीतील रोपे पिशवी काढून आतील मातीसह अशाप्रकारे धरावे की, जेणेकरून रोपांची कॉलर जमिनीच्या पातळीत येईल. संपूर्ण मूळ सरळ राहील, दुमडले जाणार नाही. रोपे सकाळी किंवा संध्याकाळी लावा, माती व दगडाने आळे करा ( साधारणत 2 फुट व्यासाचे- उताराच्या जमिनीसाठी खालील बाजूस अर्धवर्तुळाकार तर सपाट जमिनीसाठी पूर्ण वर्तुळाकार आळे करावे म्हणजे पावसाचे पाणी रोपाला सहजपणे मिळेल.वृक्षारोपण करताना खड्डे घेऊन खड्ड्यांमध्ये वड, पिंपळ, कडुनिंब, करंज, जांभूळ, आंबा, बोर, चिंच, पळस, शिंदी, करवंद आदी देशी रोपांची लागवड करणे आवश्यक आहे.
पूर्वी या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सुबाभूळ, गुलमोहोर, निलगिरी अशी परदेशी झाडे भारतात लावली गेली. या झाडांची आपल्या स्थानिक पक्ष्यांना सवय नसल्याने या झाडांचा अथवा या झाडांची पाने, फुले, फळे यांचा वापर भारतीय पक्षी करत नाहीत. वर्षभर आपण खात असलेल्या विविध फळांच्या बिया साठवून ठेवल्यास त्या पावसाळ्यात कुठे फिरायला गेलो तर त्या आजूबाजूला टाकल्यास त्यातील काही बिया तरी रुजण्यास मदत होईल. ही कल्पना खरेच खूप छान आहे. सध्या आंबे, फणस, जांभळे वगैरेचे दिवस आहेतच. त्यामुळे या सगळ्या फळांच्या बिया एकत्र करून ठेवायला हरकत नाही. शिवाय ही खास आपल्या भूमीतील झाडे. मग ही झाडे रुजवायला थोडा अजून सजग हातभार लावता येईल.
समजा प्रत्येकाने / किंवा एखाद्या गटाने मुद्दाम यंदाच्या पावसाळ्यात असा प्रयत्नपूर्वक उपक्रम हाती घेतला तर पर्यावरण वाढीस निश्चितच मदत होईल. या बियांबरोबरच जर शक्य असेल तर दुकानांतून खास इतर बिया अथवा झाडेच विकत घेतली आणि पाऊस सुरू झाल्यावर आठवडाभराने गावा / शहराबाहेरच्या एखाद्या वापरात नसलेल्या जमिनीच्या तुकड्यावर लावणे गरजेचे आहे.
यासाठी एकट्याने, कुटुंबासह जाऊन लावा, मित्रमैत्रिणींबरोबर जाऊन लावा, एखाद्या संस्थेतर्फे मोहीम काढून लावा, गट करून लावा, एक बी लावा, एक झाड लावा, ट्रकभर झाडे लावा …… पण लावा! कोणकोणती झाडे लावता येतील? उपयोगी झाडे लावण्यावर कटाक्ष ठेवायला हवा म्हणजे स्थानिक उपयुक्त देशी वृक्षच लक्षात घेतले पाहिजे.
विजय गिते
फळबागांची लागवड करावी स्थानिक पातळीवर योग्य वातावरण पाहून वृक्षांची लागवड करावी. येवला, नांदगाव सारख्या कोरडवाहू भागामध्ये व कमी पावसाच्या क्षेत्रात सीताफळांसारख्या फळबागांची लागवड करावी. याबरोबरच चिंच,कवठ, आवळा, जांभूळ, कढीपत्ता, शेवगा, हादगा या फळझाडांची लागवड केल्यास उत्पन्नही मिळू शकते. वड, पिंपळ,शिसव,कडुलिंब अशा प्रकारची देशी झाडे लावावी. ही झाडे लावताना ग्रामपंचायत क्षेत्रामधील पडीत जमिनीत म्हणजेच गायरान गावठाण या भागात वृक्षारोपण केल्यास ग्रामपंचायतीचेही उत्पन्न वाढते. शिवाय रोजगारही उपलब्ध होतो.
नयन पाटील, कृषी अधिकारी,मनरेगा जिल्हा परिषद




