Saturday, November 9, 2024

भराड

– वैजयंती सिन्नरकर

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

- Advertisement -

आलो बघाया दुरून

तुझ्या सत्वाच लेण

आई भराडी माते ग

दे ग दे मला दर्शन

मुले जत्रेत फिरत असताना त्यांच्या कानावर हे शब्द पडले. ते बाबांना विचारू लागले हे काय आहे? तेव्हा संजय त्यांना समजावून सांगू लागला. भैरवनाथाचे उपासक भराडी म्हणून ओळखले जातात. अंबेचा गोंधळ, खंडोबाचे जागरण आणि भैरवनाथाचे भराड हे कूळधर्म कुळाचार म्हणून लग्न, मुंजीच्या प्रसंगी सादर होते .

श्री देवी भराडी माका पाव गे

आज दर्शन माका दाव गे

आंबा माता तू तुळजा भवानी

दुर्गा माता तू माय भवानी

माझ्या हाके तू धाव गे

आज दर्शन माका दाव गे

अशा पद्धतीने भराडी देवीचे गुणगान गायले जातात. मुलांनो, हे गाताना त्यांचा पोशाख आणि ते गाणारे कोण असतात? याची माहिती आता ऐका. डोक्याला भगवा रुमाल, अंगात भगवा सदरा, त्यावर जॅकेट, सफेद धोतर आणि काखेत झोळी, गळ्यात चांदीची शृंगी म्हणजे शिंगी असा भराड्याचा वेश असतो. विवाह मंगलकार्यापूर्वी सोनाराकडून देव उजळून आणल्यावर व कार्य उरकल्यावरही भराड करतात. तसेच नवरात्रोत्सवाच्या वेळेस रोज रात्री भैरवनाथाच्या मंदिरात भराड होते.

भराड सादर करणारे जोगी आणि गोसावी दोघेही असतात. कूळधर्म-कुळाचार, लग्न, मुंजप्रसंगी सादर होणारे भराड हे नुसते भराड नसून ते विधीनाट्य आहे. नाथपंथीय डौरी (डावरी) गोसावी समाजातील दीक्षा घेतलेले भैरवनाथाचे उपासक भराड सादर करतात. कालभैरव हे भरडांचे आराध्य दैवत. भराडी लोकांची वस्ती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर या काही जिल्ह्यांमध्ये तसेच खान्देशातील आणि मराठवाड्यात काही भागांमध्ये आहे. भराड घालताना अगोदर पाच पावली होते.

भैरवनाथांच्या मंदिराचे विशेष म्हणजे शेतात भैरवनाथाचे मंदिर ज्या दिशेला असेल त्या दिशेला गोमूत्र, गोमय यांनी शेतातली जागा सुचिर्भूत करून भैरवनाथाची आरती केली जाते व पाच पावली झाल्यावर नवरा-नवरी पुन्हा घराकडे येतात. त्यावेळेस भैरवनाथ, देवी, खंडोबा यांचे घट मांडले जातात.

जोंधळ्याच्या पाच ताटांचे मखर तयार केले जाते, या मखराला फुलांचा हार घातला जातो, सजवलेल्या मखरात गहू-तांदळाचा चौक पाटावर घातला जातो. त्यावर शक्ती देवता, शिवकुलातील देवता यांचे प्रतिनिधी घट भरून या पाणी भरलेल्या कतशात नागवेलीची पाच पाने टाकून त्यावर नारळ ठेवले जाते. भराडातील हा घट भंडार, कुंकू, विभूती आणि फुले यांनी भरला जातो.

चालू घडामोडी, समाजातील वास्तव यांचे संदर्भ घेऊन भराड आख्यान सादर केले जाते. यामध्ये समाजातील सर्व स्तरातील घटना-प्रत्ययांचे भाष्य व विनोदी कवने सादर केली जातात. त्याला कंडी असे म्हटले जाते. भराडात कंडीसोबत खांडव्याही येतात. भराडाच्या तुलनेत जागरणात आणि गोंधळात कंडी आणि खांडवे अधिक येतात कारण भरडाच्या तुलनेत जागरणात आणि गोंधळात कथन कौशल्य अधिक असते. शिवाचे वाद्य म्हणून डम डिग्री, पूजले जाते तर भराडातील घटासमोर शैलसिंगी, त्रिशूल, डम डिग्री या वस्तूंची पूजा केली जाते. पाच पावली, कोटंबापूजन, काकडे नाचवणे, ओझे उतरणे इत्यादी विधी करून भैरवनाथाचे भराड केले जाते. डम डिग्री या वाद्याला भराडांमध्ये अधिक महत्त्व असते. शिवस्तुती, गण-देवतांना आवाहन, भैरवनाथाची स्फुट पदे, शंकराची अथवा भैरवनाथाचे अवतार कथा व आरती असा भराडाचा आविष्कार क्रम असतो. भराडात डौर किंवा डम डिग्री तुणतुणे आणि मंजिरी हे वाद्य वाजवतात. डम डिग्री एक चर्मवाद्य. शिवाने तांडव नृत्याच्या प्रसंगी या वाद्याची निर्मिती केली असे म्हणतात. त्याच्या दोन्ही तोंडाचा व्यास आठ-आठ अंगुळे असतो.

भरडाप्रमाणे पोवाडा, कलगीतुरा, गोंधळ, तमाशा अशाप्रकारच्या सर्व लोककलांमधून तंतुवाद्य वापरली जातात. हातात धरण्याइतके जाड असलेले दोन-अडीच फूट लांबीच्या बांबूची काठी हातात घेऊन त्याच्या तळाशी एक पोकळ लाकडी नळकांडे बसवलेले असते. कातड्याच्या माध्यमातून ते बांबूच्या वरच्या टोकापर्यंत त्याची तार खेचून बसवतात आणि बांबूत खोचलेल्या छोट्याशा खुंटीत ती बांधतात.

ते डाव्या हातात धरून उजव्या हातातील एका लाकडी तुकड्याने हे वाद्य वाजवतात. मंजिरी हे वाद्य भराडी व त्यांचे सहकारी वाजवतात. मंजिरी आणि तुणतुणे हे दोन्ही वाद्य साथसंगत करणारी सहवाद्य म्हणून भराडात येतात. तालवाद्य, लयवाद्य असलेले डम डिग्री आणि तंतुवाद्य असलेले तुणतुणे या दोन्ही वाद्यांचे प्राधान्य भराडात दिसते. आजही भराडाकडे केवळ एक कूळधर्म-कुळाचार, एक विधीनाट्य म्हणून पाहिले जाते. देवीचा गोंधळ आणि खंडोबाचे जागरण हे कूळधर्म-कुळाचार विधीनाट्य म्हणून आणि पुढील काळात लोकप्रिय लोककलाप्रकार म्हणून प्रकाशात आले.

वाजता की ढोल नगारे

चला चला रे

चला चला रे

जत्रा ही भरली रे

श्री देवी भराडी मातेची

गोंधळ महर्षी, राजारामबापू कदम यांच्या कदम गोंधळावर जांभूळ आख्यान हे नाटक इंडियन नॅशनल थिएटरने रंगभूमीवर आणले तसेच खंडोबाच्या जागरणावर शाहीर शंकरराव धामणीकर यांच्या खंडोबा बाणाईचे लगीन या हस्तलिखितावर इंडियन नॅशनल थिएटरनी खंडोबाचे लगीन हे नाटक रंगभूमीवर आणले. भराडावर मात्र अशाप्रकारचे नाटक रंगभूमीवर आले नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणीमधील मसुरे गावातील आंगणेवाडीच्या येथे भराडी देवीची जत्रा भरवली जाते. या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही तारीख कॅलेंडरमध्ये ठरलेली नसते तर विशिष्ट पद्धतीने ती तारीख ठरवली जाते. मोठ्या प्रमाणात चाकरमाने या जत्रेला येतात.

जसजशी ग्रामसंस्कृती बदलत गेली तसतसा या विधी विधानांचा धागा दिवसेंदिवस विलग होऊ लागला आणि लोकसंस्कृतीचे उपासक असलेला गोंधळी, वाघे, भराडी यांना उदरनिर्वाहासाठी पर्यायी जोडव्यवसायाचा शोध घ्यावा लागला.

भराड्यांची भराड ही अशी एक कला आहे. असे सर्व जरी असले तरी माहेरवाशीण, सासूरवाशीण सर्वजणी या भराडीच्या जत्रेला नटूनथटून येतात.

चालल्या ग सुवासिनी

आज नवाकोरा नेसून

भराडी देवीच्या दर्शनाने

डोळे जातील ग दिपून

चालल्या ग सुवासिनी

नवी साडी नवी चोळी

वेणी माळून केसात

संजय मुलांना म्हणाला, समजले या लोककलेविषयी, मुले पुढच्या कलेकडे निघाली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या