नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशातील औषध विक्री आणि रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. आता सर्दी-खोकला झाला म्हणून औषधांच्या दुकानात जाऊन थेट ‘कफ सिरप’ विकत घेता येणार नाही. केंद्र सरकारने कफ सिरपच्या विक्रीबाबत अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. यापुढे डॉक्टरांच्या लेखी चिठ्ठीशिवाय कोणत्याही औषध दुकानात कफ सिरप मिळणार नाही.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, आता खोकल्याच्या सिरपसह कोणत्याही प्रकारची लिक्विड औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार नाहीत. सरकारने ‘ड्रग्स रूल्स, १९४५’ मध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती करून सिरपच्या ओव्हर-द-काउंटर विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान मध्ये दूषित कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर लहान मुलांच्या कफ सिरपच्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले होते. देशभरात औषध निर्मिती आणि त्याच्या विक्रीवर कडक देखरेख ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर, केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
मात्र, खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चघळण्याच्या गोळ्या किंवा टॅब्लेट्स पूर्वीप्रमाणेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय उपलब्ध राहतील. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने या संदर्भात मसुदा जारी करून हरकती मागवल्या होत्या, ज्यावर आता अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे.
आरोग्य मंत्रालयाने ९ जून २०२६ रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या संदर्भातील एक मसुदा तयार करून त्यावर जनतेची मते मागवण्यात आली होती. त्यावर विचार केल्यानंतर हा अंतिम निर्णय घेण्यात आला.
NEET UG Exam: NEET परिक्षेआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खबरदारी म्हणून टेलिग्राम ॲपवर घातली बंदी
या निर्णयाचा काय परिणाम होणार?
थेट खरेदी बंद: आता तुम्हाला खोकला झाल्यास घराजवळील मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन थेट कफ सिरप विकत घेता येणार नाही.
प्रिस्क्रिप्शन अनिवार्य: कोडाईन सारखे अंमली पदार्थ किंवा इतर नशा आणणारे घटक असलेल्या सिरपसोबतच, आता साध्या कफ सिरपसाठीही डॉक्टरांची चिठ्ठी दाखवावीच लागेल.
गोळ्यांना सवलत: खोकल्याच्या चघळण्याच्या गोळ्या किंवा नेहमीच्या टॅब्लेट्स पूर्वीसारख्याच मेडिकलमध्ये सहज मिळतील.
अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने ‘ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, १९४०’ च्या कलम १२ आणि ३३ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा बदल केला आहे. या नियमांना आता ‘ड्रग्स (पाचवी सुधारणा) नियम, २०२६’ असे म्हटले जाईल. सरकारी राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासूनच हे नियम देशभरात लागू झाले आहेत. या निर्णयामुळे आता नागरिकांना साध्या खोकल्याचे सिरप खरेदी करण्यासाठीही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन मेडिकल चालकाला दाखवणे बंधनकारक असणार आहे.




