अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिकेच्या अर्थसंकल्पावर स्थायी समितीत जोरदार चर्चा रंगली असून, पाणीपट्टीत 25 टक्के कपात करण्यासह विविध विकासकामांसाठी कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली. शहरातील पत्रकार चौकात शहर वाहतूक शाखेचे कार्यालय स्थलांतरित करून तेथे अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी पाच कोटींची विशेष तरतूद करावी, अशी प्रमुख शिफारस सभापती सुभाष लोंढे यांनी केली.
तसेच अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सवासाठी 25 लाख, पिंपळगाव माळवी येथे नशामुक्ती केंद्र, एकल महिलांसाठी वसतिगृह, बालकांसाठी बालसंस्कार केंद्रासाठी एक कोटी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वृध्दाश्रम उभारण्यासाठी निधी देण्याच्या सूचना नगरसेवक निखील वारे, बाबासाहेब वाकळे यांनी मांडल्या.
महापालिकेच्या स्थायी समितीत बुधवारी (18 मार्च) सभापती लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली बजेटवर चर्चा झाली. यावेळी नगरसेवक वारे, वाकळे, सुरेश बनसोडे, मनोज कोतकर, मनोज दुलम, आकाश कातोरे, नगरसेविका संध्या पवार, पौर्णिमा गव्हाळे, सोनाबाई शिंदे, आयुक्त यशवंत डांगे, नगरसचिव मेहेर लहारे आदी उपस्थित होते.
सभेत नगरसेवकांनी महापालिकेच्या बजेटवर तीव्र नाराजी व्यक्त केली. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याचा आरोप करत फुगीर व दिशाभूल करणारे बजेट सादर करण्यात आले आहे, अशी टीका करण्यात आली. 11 महिन्यांत केवळ 60 कोटींची वसुली झाली असताना अपेक्षित वसुली 201 कोटी होती, तर बांधिल खर्च 350 कोटी असल्याने आर्थिक तुटीचे संकट गंभीर असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले. महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी ठोस उपाययोजना केल्या नसल्याचा आरोपही करण्यात आला. घरपट्टी, पत्राशेड, जाहिरात फलक यांमधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सदस्यांनी सांगितले. खर्चात काटकसर करून कार्यालयीन खर्च कमी करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरही चर्चा झाली. नागरिकांवर हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने कुत्रे पकडण्यासाठी 3 कोटींच्या वाढीव निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली. बेकायदा वृक्षतोडीवरही सदस्यांनी आक्षेप घेत, दोषींवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यावर आयुक्त यशवंत डांगे यांनी विनापरवाना वृक्षतोड करणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. याशिवाय, मुळा धरणाच्या जलवाहिनीमार्गे पाणी घेणार्या गावांकडून सुमारे 150 कोटींची पाणीपट्टी थकीत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. थकबाकी वसूल करावी किंवा संबंधितांचे नळ कनेक्शन तोडावे, अशी मागणी सदस्यांनी यावेळी केली. अर्थसंकल्पावरून सत्ताधारी व प्रशासनामध्ये मतभेद स्पष्ट दिसून आले आहे.
पाणीपट्टीत 25 टक्के कपात करा : लोंढे
पाणीपट्टी दरवाढीवरूनही वाद निर्माण झाला. वाढीव दरामुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याने 25 टक्के कपात करण्याची शिफारस सभापती लोंढे यांनी केली. यावर उत्तर देताना आयुक्त डांगे यांनी सांगितले की, गेल्या 22 वर्षांत प्रथमच पाणीपट्टी वाढवण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेवर 50 कोटी खर्च होत असताना वसुली केवळ 10 कोटी होती. त्यामुळे दर 1500 रुपयांवरून 2400 रुपये करण्यात आले असून, त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. तसेच नव्या सर्वेक्षणानुसार घरपट्टी आकारली जात असून, तक्रारींवर सुनावणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




