.
मुंबई । प्रतिनिधी Mumbai
राज्यात मे आणि जूनच्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी दहा दिवसांत सर्व पंचनामे आणि सर्वेक्षणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी येथे दिले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत भरणे यांनी अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतला. या बैठकीत राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये एकूण ६१ हजार ४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी १८ हजार १२१ हेक्टर क्षेत्र केळी पिकाखालील आहे. बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण आणि पंचनाम्याची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. विशेषतः ६ जून रोजी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याचे अचूक मूल्यमापन करणे आवश्यक असल्याचे भरणे यांनी सांगितले.
जळगाव, बुलडाणा, सोलापूर, पुणे, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फळपिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. जळगाव जिल्ह्यात मे आणि जून महिन्यात मिळून ७ हजार ५९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी ७ हजार २१६ हेक्टर क्षेत्र केळी पिकाखालील आहे. जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि महसूल विभागामार्फत पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. ४ जून आणि त्यानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीने काटेकोरपणे करावेत. विमाधारक तसेच विमाविहीन शेतकऱ्यांचे नुकसानही अचूक नोंदविण्यात यावे. आवश्यकतेनुसार ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण पूर्ण करावे, अशी सूचना भरणे यांनी केली.
या बैठकीला पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले (दूरदृश्य प्रणालीद्वारे), आमदार चंद्रकांत पाटील, अमोल जावळे तसेच कृषी, महसूल आणि विमा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




