अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेचे बजेट शनिवारी गदारोळाच्या वातावरणात अखेर मंजूर करण्यात आले. महासभेत विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांमध्ये जोरदार चर्चा झाली. विशेषतः माळीवाडा वेस पाडण्याच्या मुद्द्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात गदारोळ झाला, तर शिवसेनेचे गटनेते दत्तात्रय कावरे व माजी महापौर सुरेखा कदम यांनी या भूमिकेला विरोध दर्शविला.
नगरसेवक संपत बारस्कर यांनी ही वेस तात्काळ पाडावी, त्याला ऐतिहासिक संदर्भ नाही. महापालिकेने कारवाई केली नाही, तर आम्हीच ती वेस पाडू, असा इशारा देत प्रशासनाला थेट आव्हान दिले. कुमार वाकळे यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्मचार्यांच्या नियुक्त्या का होत नाहीत, असा सवाल केला. ज्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांना तात्काळ नियुक्ती द्या, अशी मागणी त्यांनी केली. मनपाची रक्तपेढी बंद असल्याच्या मुद्द्यावर विकास जगताप यांनी प्रशासनाला धारेवर धरले. दरमहा सहा लाख खर्च करूनही किती कॅम्प घेतले? असा प्रश्न त्यांनी विचारला. डॉ. शंकर शेडाळे यांनी तीन महिन्यांपासून कर्मचारी नसल्याचे सांगितले. महापालिकेला चालवता येत नसेल तर एखाद्या संस्थेला चालवायला द्या, अशी आक्रमक भूमिका जगताप यांनी घेतली. यावर गणेश भोसले यांनी रक्तपिढी नवीन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा, असा पर्याय सुचविला.अविनाश घुले यांनी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली. बारस्कर यांनी प्रभागातील कर्मचार्यांच्या बदल्यांवर प्रश्न उपस्थित करत काम करणारे कर्मचारी हटवून काम न करणारे दिले, असा आरोप केला.
आयुक्त यशवंत डांगे यांनी नियोजनासाठी फेररचना केली, असे स्पष्टीकरण दिले. मयूर बांगरे यांनी मागासवर्गीय कल्याण निधीबाबत प्रश्न उपस्थित करत 8.41 कोटींचा निधी रोख स्वरूपात खर्च करा, अशी मागणी केली. दिपाली बारस्कर, वर्षा सानप व सुनीता भिंगारदिवे यांनी शहरात महिला स्वच्छतागृहांची उभारणी करण्याची मागणी केली. अमोल येवले यांनी केडगाव परिसरातील पाणीटंचाई मांडत नवीन टाक्या उभारण्याची गरज व्यक्त केली. बारस्कर यांनी सावेडी उपनगरात महापालिकेचे रुग्णालय उभारण्याची मागणी केली. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेच्या शाळांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करत डिजिटलायझेशनसाठी निधी वाढवण्याची मागणी केली.
शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रोफेसर कॉलनी चौक परिसरातील महानगरपालिकेचे कचरा डम्पिंग स्टेशन तातडीने अन्यत्र हलविण्यात यावे, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात योग्य विद्युत व्यवस्था व सांडपाणी निचरा करण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका सुनिता कुलकर्णी, सोनाबाई शिंदे तसेच नगरसेवक मनोज दुल्लम व करण कराळे यांनी महापौर ज्योतीताई गाडे यांच्याकडे केली आहे. प्रोफेसर कॉलनी चौक हा अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून नाट्यगृहाच्या शेजारीच महानगरपालिकेचे कचरा डम्पिंग स्टेशन कार्यरत आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. याच ठिकाणी अलीकडेच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आलेला असल्याने नागरिकांची वर्दळ वाढली आहे. परिसरातील नागरिकांनी हे डम्पिंग स्टेशन अन्यत्र हलविण्याची वारंवार मागणी केली आहे.




