Saturday, September 5, 2026
HomeनगरAMC Election : इच्छुकांची अर्ज खरेदीसाठी झुंबड

AMC Election : इच्छुकांची अर्ज खरेदीसाठी झुंबड

पहिल्याच दिवशी 636 अर्जांची विक्री

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारपासून (23 डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. निवडणूक कार्यालयात दुपारपर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहिला मिळाले. महापालिकेने 17 प्रभागांसाठी प्रभागनिहाय सहा निवडणूक कार्यालये स्थापन केली आहेत. पहिल्या दिवशी या कार्यालयातून 636 अर्जाची विक्री झाली. अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली होती. मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. पहिला दिवस निरंक केला. दरम्यान, राजकीय पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 30 डिसेंबरपर्यंत पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडावा लागणार असल्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

एकीकडे अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून दुसरीकडे शहराच्या राजकीय हालचालींचा धांडोळा घेतला असता महायुतीमधील तिन्ही पक्षांचे जागा वाटप अजून अंतिम झालेले नाही. जागांची खेचाखेची सुरू आहे. एकमेकांचे उमेदवार पावन करून घेतले जात आहेत. 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. 31 डिसेंबर रोजी छाननी होणार असून 2 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज माघार घेता येणार आहे. सूचक व अनुमोदकांच्या सह्यांसह उमेदवारांना अर्ज दाखल करावे लागणार आहे. उमेदवारी अर्जासोबत वैयक्तिक माहिती, कुटुंबाची माहिती, संपत्तीची माहिती, गुन्हे व न्यायालयीन खटल्यांची माहिती असलेले शपथपत्र सादर करावे लागणार आहे.

एका उमेदवारी अर्जाची किंमत 100 रूपये इतकी आहे. राजकीय पक्षांमार्फत उमेदवारी करणार्‍यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत संबंधित राजकीय पक्षाचा एबी फॉर्म जमा करावा लागणार आहे. मुदतीत एबी फॉर्म जमा न केल्यास संबंधित अर्ज छाननीच्यावेळी बाद होणार आहे. इच्छुक उमेदवारांना किमान 100 शब्दांत प्रभाग विकासाची लेखी ग्वाही द्यावी लागणार आहे. उमेदवाराला एक सूचक व एक अनुमोदक आवश्यक असणार आहे. खुल्या जागेसाठी 5 हजार व राखीव जागेसाठी अडीच हजार रूपये डिपॉझीट लागणार आहे.

प्रचारासाठी 48 तास अगोदर परवानगी आवश्यक
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आचारसंहिता काळात प्रचार सभा, प्रचाराची रॅली यासाठी किमान 48 तास अगोदर परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच, प्रचारासाठी वापरले जाणारे साहित्य, सोशल मीडियावर प्रचारासाठी वापरला जाणारा मजकूर आदींचीही पूर्वपरवानगी आवश्यक आहे. उमेदवारासह सूचक व अनुमोदकाचेही ना देय प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. सर्वांंनी आचारसंहितेचे पालन करावे, उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा डांगे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

खुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड – राजयोगी ब्रह्माकुमार...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik खुशी हाच माझा स्वभाव आणि धर्म आहे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले पाहिजे. केवळ मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा इतरांना देण्याची वृत्ती आत्मसात...