अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत्यावेळी इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन केले. सोमवारी शहरातील अनेक प्रभागातील इच्छुकांनी समर्थकांसह वाजतगाजत उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान नगर शहरात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून उमेदवारी मिळण्याआधीच काही इच्छुकांनी शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केल्याने निवडणुकीसाठी रंग भरण्यास सुरूवात झाली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेसह दिल्लीगेट परिसरात जागोजागी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नगर महापालिकेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज मंगळवार शेवटचा दिवस आहे. निवडणुकीत महायुती विरोधात महाविकास आघाडी लढत होणार असल्याचे सांगण्यात येत असले. तरी जोपर्यंत उमेदवारांची यादी अथवा महायुती- महाआघाडीची अधिकृत घोषणा होत नाही. तोपर्यंत काहीही होऊ शकते, असे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान नगर शहरात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद मोठी असून यांच्याकडून उमेदवारी मागणार्यांची संख्या मोठी आहे. या दोघांकडून उमेदवारी न मिळणार्यांना गळाला लावण्याचा डाव महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट, उबाठा ठाकरे गट आणि काँग्रेसचा आहे. यामुळे सर्वांची उत्सुकता तानली गेली आहे.
नगर शहरात सकाळपासून अनेक इच्छुकांनी वाजतगाजत नगर शहरातून मिरवणुकीद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नगर शहरात आणि भागात राजकीयंसह कार्यकर्त्यांची धावपळ दिसून आली. तसेच उमेदवारीसाठी लॉबिंन करताना अनेकजण दिसले. यावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयासह प्रमुख नेत्यांच्या घराच्या अवतीभोवती कार्यकर्त्यांचा गराडा दिसून आला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी असणार्या सर्वच कार्यालय परिसरात गर्दी दिसत होती. सोमवारी खर्याअर्थाने नगर शहारात मनपा निवडणुकीसाठी रंगत दिसून आली. दरम्यान, उमेदवारी दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असून यावेळी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतील धुसफूस शमली
महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महायुतीच्या वाटपाकडे महाविकास आघाडीच्या नजरा लागलेल्या आहेत. त्यामुळे आज (मंगळवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना उबाठामध्ये जुन्या निष्ठावंतांना एबीफॉर्म देण्यावरून सुरू असलेली धुसफूस अखेर शमली आहे. युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड यांच्या गटाच्या उमेदवारांना एबीफॉर्म देण्यास नकार देण्यात आला होता. मात्र, त्यावर वरिष्ठांनी लक्ष घातल्यानंतर त्यावर पडदा पडला. तर दुसरीकडे काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष व त्यांच्या पत्नीसह अन्य चार अशा सहाजणांना एबीफॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व खासदार नीलेश लंके करीत असून त्यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत शिवसेना उबाठा गटासह मनसे या दोन पक्षाला 28 ते 30 जागा देण्याचे मान्य करण्यात आले असून त्यातून मनसेला 10 ते 12 जागा दिल्या जाणार आहेत. तर उर्वरित 38 ते 40 जागा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला येणार आहेत.




