Thursday, June 18, 2026
HomeनगरAhilyanagar : महानगरपालिकेसाठी सरासरी 65 टक्के मतदान; आज निकाल

Ahilyanagar : महानगरपालिकेसाठी सरासरी 65 टक्के मतदान; आज निकाल

सकाळी निरुत्साह || दुपारनंतर काही केंद्रांवर तोबा गर्दी || उमेदवारांची मतदारांना हात जोडून विनंती

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी (15 जानेवारी) सकाळी 7.30 वाजल्यापासून शहरात उत्साहात मतदानाला सुरूवात झाली. सकाळच्या थंडीचा कडाका, दुपारच्या उन्हाचा चटका आणि ठिकठिकाणी निर्माण झालेल्या अडचणी असूनही मतदारांनी हक्क बजावण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांकडे धाव घेतली. 70 शाळांमधील 345 मतदान केंद्रांवर दिवसभर विविध घडामोडी घडत राहिल्या. सकाळी 7.30 ते 9.30 या पहिल्या दोन तासांत शहरात सरासरी 7.87 टक्के मतदान झाले. सकाळी 11:30 वाजेपर्यंत 20.16 टक्के, दुपारी दीड वाजेपर्यंत 33.91, साडेतीनपर्यंत 48.49 मतदान झाले. सकाळनंतर काहीसा अल्प प्रतिसादानंतर दुपारनंतर केंद्रावर गर्दी वाढली ती काही केंद्रावर सायंकाळी साडेपाच वाजेनंतर देखील होती. प्रशासनाने दिलेल्या अंतरीम आकडेवारीनुसार सरासरी 64.35 टक्के मतदान झाले.

- Advertisement -

महापालिका निवडणुकीसाठी 17 प्रभागात 68 जागा असून त्यातील पाच जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे 63 जागेसाठी 283 उमेदवार उभे होते. यासाठी गुरूवारी 345 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. आज (शुक्रवार) दुपारपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल हाती येणार आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळी गुलमोहर रस्त्यावरील आनंद विद्यालय शाळेत सकाळी 9.30 नंतर मतदारांचा ओघ वाढला. मतदान करून बाहेर पडणारे अनेक तरूण ‘सेल्फी’ घेताना दिसले. शहराच्या विविध भागांत नागरिक कुटुंबासह मतदानासाठी बाहेर पडले होते. काही मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, तसेच अपघातात जखमी झालेले मतदार वॉकर व व्हीलचेअरच्या सहाय्याने मतदानासाठी आले. त्यांच्या या जिद्दीने उपस्थितांना प्रेरणा मिळाली. सावेडी येथील समर्थ विद्या मंदिर शाळेत सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली. सहा मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. आपला प्रभाग व केंद्र शोधण्यासाठी अनेक मतदारांनी बंदोबस्तावरील कर्मचार्‍यांची मदत घेतली. प्रेमराज सारडा महाविद्यालय परिसरातही मतदान केंद्रांवर सतत वर्दळ होती.

सर्जेपुरा भागातील अहिल्याबाई होळकर शाळेत दुपारी दोनच्या सुमारास उन्हात मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मुकुंदनगर भागात सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. मतदान प्रक्रिया सुरू असतानाच काही ठिकाणी तक्रारींचे प्रकार समोर आले. मतदान केंद्रांमध्ये कोणतीही अनधिकृत व्यक्ती हस्तक्षेप करणार नाही, तसेच उमेदवार व त्यांचे समर्थक केंद्रापासून 200 मीटरच्या बाहेरच राहतील, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. आयकॉन पब्लिक स्कूल येथील केंद्रावर दुपारपर्यंत रांगा कायम होत्या. ज्येष्ठ मतदारांना व्हीलचेअरवरून मतदान केंद्रात नेण्यात आले. सीताराम सारडा विद्यालयात दुपारी दीडच्या सुमारास मोठी गर्दी होती. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मतदारांना हात जोडून, पाय पडून मतदानाची विनंती करताना दिसले.

सावेडीतील डॉन बॉस्को शाळेतील मतदान केंद्राजवळ ड्रेनेजची तीव्र दुर्गंधी होती. त्यामुळे मतदार नाराजी व्यक्त करत होते. एका केंद्रावर मार्कर पेनची शाई फिकट उमटत असल्याने तर्जनीवर अधिक दाब देऊन शाई उमटवावी लागत होती. केंद्राबाहेर वाहनांची गर्दी होती. प्रमुख पक्षांचे उमेदवार मतदारांना हात जोडून अभिवादन करत होते. अनेक मतदान केंद्रांजवळ रस्त्यालगत गर्दी झाल्याने वाहतुकीचे नियोजन कोलमडले. मतदारांच्या वाहनांमुळे काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. काही केंद्रांवर मतदारांना त्यांच्या अनुक्रमांकाच्या चिठ्ठ्या वेळेत न मिळाल्याने गोंधळ उडाला.

नावांची शोधाशोध करताना रांगा वाढल्या. सकाळची थंडी, दुपारचे ऊन, तक्रारी, वाहतूक कोंडी आणि व्यवस्थापनातील त्रुटी असूनही अहिल्यानगरकरांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला. तरुणांचा उत्साह, ज्येष्ठांची जिद्द आणि सर्वसामान्य मतदारांचा संयम यामुळे संपूर्ण दिवस शहरात लोकशाहीचा उत्सव अनुभवायला मिळाला. आता या मतदानातून शहराच्या भविष्यासाठी कोणता कौल बाहेर येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अपक्ष उमेदवाराचा आक्षेप
अपक्ष उमेदवार जयंत येलूरकर यांनी समर्थ विद्या मंदिर शाळेतील मतदान केंद्रांवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी थेट घुसखोरी करून हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप सकाळी केला. संबंधी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत त्यांची बाचाबाची झाली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात तेथे कामकाजासाठी उपस्थित असलेल्या निवडणूक प्रशासनाला त्यांनी जाब विचारत तेवढ्यात केंद्रावर आलेल्या पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे तोंडी तक्रार नोंदवली. तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक घार्गे यांनी तात्काळ बंदोबस्त अधिक कडक करण्याचे आदेश दिले.

महिला उमेदवारांत बाचाबाची
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या डी.एड. कॉलेजमधील एका केंद्रावर महिला उमेदवार जास्त वेळ आत थांबल्याने विरोधी उमेदवारांच्या महिला प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. त्यातून दोन्ही गटांच्या महिलांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. मात्र बंदोबस्तावरील महिला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद मिटवला व त्यांना केंद्राच्या बाहेर काढून दिले.

केडगावात बोगस मतदान
केडगाव मधील प्रभाग क्र. 17 मध्ये सोनेवाडी रस्त्यावरील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा प्रकार दुपारी उघडकीस आला. एका महिला दुपारी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्या असता तेथील अधिकार्‍यांनी तुमच्या नावावर मतदान झाले असल्याचे त्यांना सांगितले. हे ऐकून त्यांना धक्का बसला. त्यांनी हाताची सर्व बोटे त्या अधिकार्‍यांना दाखवत माझ्या हाताच्या बोटाला शाई नाही, मी मतदानाला आलेच आले. मग माझे नावावर मतदान कसे झाले. त्यावर अधिकार्‍यांनी आम्ही काहीच करू शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्या महिलेने तीव्र संताप व्यक्त केला.

मतदान संपण्याआधीच विजयाचा जल्लोष
मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या टप्प्यात असतानाच काही उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी विजयाचा दावा करत जल्लोष सुरू केल्याचे चित्र शहरात गुरूवारी सायंकाळी पाहायला मिळाले. अधिकृत निकाल जाहीर होण्यासाठी अजून काही तासांचा अवधी असताना, गुलाल उधळत, बॅनर लावत आणि घोषणा देत उमेदवारांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मतदानानंतर मिळालेल्या प्रतिसादाबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. विजय निश्चित झाल्याच्या विश्वासातून समर्थकांनी एकत्र येत जल्लोष केल्याचे सांगितले जात आहे.

मतदारांच्या पायात गुंतला चायना मांजा
शहरात चायना मांजावर बंदी असतांना संक्रात सणानिमित्त सर्रास चायना मांजाचा वापर झालेला दिसला. याचाच फटका मतदानाच्या दिवशी मतदारांना बसला. शहरातील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलमध्ये येणार्‍या मतदारांच्या पायात चायना मांजा अडकत असल्याचे या केंद्रात दिसले. त्यामुळे मतदानाच्या आधी चायना मांजाचा गुुंता सोडवून मतदान केंद्रात प्रवेश करावा लागला.

वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा
नगर शहरातील रूपीबाई बोरा हायस्कुलधील केंद्रात मतदानासाठी येणार्‍या मतदारांनी 100 मिटरच्या आत मोटारसायकल लावल्याने वाहतूक शाखेने ऑनलाईन दंडाची कारवाई केल्याचे पहायला मिळाले. या कारवाईमुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

बुथ केंद्राजवळच मतदारांना पैशाचे वाटप
उपनगरातील एका बुथजवळ काही कार्यकर्त्यांनी मतदारांना पैश्याचे वाटप केले आहे. यामुळे कार्येकर्त्याच्या मागे मतदारांची रांग लागल्याचे पाहायला मिळाली. विशेष म्हणज या लक्ष्मी वाटपकडे कोणाचे लक्ष गेले नाही. पोलिस प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

सकाळी शुकशुकाट तर दुपारी गर्दी
शहरातील बहुतांश मतदान केंद्रात सकाळी 11 वाजेपर्यंत संथ गतीने मतदान सुरू होते. संथ गतीने सुरू असलेले मतदान पाहुन कार्यकर्त्यांनी मतदारांना घरी जाऊन मतदान करण्यासाठी आवाहन केले. त्यांनतर दुपारी मात्र मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. दुपारीतर अनेक मतदान केंद्रावर उमेदवारांचे समर्थक निवांत दिसून आले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : बनावट दूध प्रकरणात एका रात्रीत सात संशयित गजाआड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फक्राबाद (ता. जामखेड) येथे उघडकीस आलेल्या बनावट दूध निर्मिती प्रकरणाच्या तपासाला स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) नवे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी...