Monday, September 7, 2026
HomeनगरAhilyanagar : बनावट दूध प्रकरणात एका रात्रीत सात संशयित गजाआड

Ahilyanagar : बनावट दूध प्रकरणात एका रात्रीत सात संशयित गजाआड

एलसीबीचे प्रभारी बदलताच चार महिने रखडलेल्या तपासाला वेग || राहुरी, नगर, पारनेर आणि श्रीरामपुरातील आरोपींचा समावेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

फक्राबाद (ता. जामखेड) येथे उघडकीस आलेल्या बनावट दूध निर्मिती प्रकरणाच्या तपासाला स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) नवे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी वेग दिला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अवघ्या एका रात्रीत सात संशयित आरोपींना अटक केल्याने या बहुचर्चित प्रकरणातील तपास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, यापूर्वी तत्कालीन प्रभारी किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग यांनी केलेल्या तपासात एकूण 41 संशयित निष्पन्न करण्यात आले होते. मात्र, चार महिन्यांच्या कालावधीत केवळ सात संशयितांनाच अटक करण्यात आली होती. नव्या प्रभार्‍यांनी पदभार स्वीकारताच सात संशयितांना एकाच गजाआड कारवाईत केल्याने पूर्वीच्या तपासाच्या गतीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. हरिदास एकनाथ गोपाळघरे (वय 34, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड), सद्दाम कमरूद्दीन शेख (वय 29), चंद्रकांत अण्णा बर्डे (वय 36, दोघे रा. उंबरे, ता. राहुरी), महेश तुकाराम मोकाटे (वय 25, रा. इमामपूर, ता. अहिल्यानगर), लक्ष्मण पोपट करंजुले (वय 31, रा. पाडळी रांजणगाव, ता. पारनेर), किशोर काशिनाथ पुंड (वय 46, रा. भोकर, ता. श्रीरामपूर) आणि सर्जेराव काशिनाथ म्हसे (वय 45, रा. शिलेगाव, ता. राहुरी) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत.

तपासात या संशयितांनी बनावट दूध निर्मितीसाठी आवश्यक रसायने, पावडर आणि अन्य साहित्याचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे. काही संशयितांनी घातक रसायनांपासून कृत्रिम दूध तयार करून त्याची विक्री केल्याचे, तर काहींनी त्याचे संकलन व वितरण केल्याचेही समोर आले आहे. 14 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने फक्राबाद येथे संयुक्त छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला होता. पॅराफिन ऑईल, 9.5 केमिकल आणि दूध फ्लेवर पावडर यांच्या मिश्रणातून मानवी आरोग्यास अपायकारक द्रावण तयार करून त्यापासून कृत्रिम दूध बनविले जात असल्याचे कारवाईत समोर आले होते. या गंभीर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.

तपासादरम्यान 41 संशयितांची नावे निष्पन्न झाली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात सुमारे 850 पानी दोषारोपपत्र जामखेड न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी चौघांना जामीन मिळाला असून तिघे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. नव्या कारवाईनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या 14 वर पोहोचली आहे. अद्याप 27 संशयित पसार असून त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या काळात आणखी अटकसत्र सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणखी संशयित आरोपींची वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पूर्वीच्या तपासावर प्रश्नचिन्ह
मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरणार्‍या रसायनांपासून कृत्रिम दूध तयार करून त्याची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस येऊन देखील या तपासाला गती देण्यात आली नाही. चार महिने तपास खेळवत ठेवला. कारण, यामधील संशयितांशी ‘खास संबंध’ जपले गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. तशा तक्रारी झाल्या आहेत. दरम्यान, विद्यमान पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसून येत असून, तपासाला मिळालेल्या नव्या गतीमुळे बनावट दूध रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. दुसरीकडे एलसीबीचे तत्कालीन प्रभारी कबाडी, तपास अधिकारी अभंग यांनी हा तपास का रखडून ठेवला, त्यांच्याविरूध्द तक्रार झाली असून त्यांची चौकशी होणार का? त्यांनी कोणत्या संबंधामुळे तपासाला बगल दिली याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सत्तर वर्षीय वृद्धेचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांसमोर आरोपी...

0
वणी | वार्ताहर | Vani दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) लखमापूर येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा संशयास्पद परिस्थितीत खून (Murder) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...