अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, गुरूवारी शहरात मतदान प्रक्रिया पार पडत असून, दोन वर्षांच्या प्रशासकराज्यानंतर शहराच्या कारभाराचा कौल मतपेटीत बंद होणार आहे. ही निवडणूक शांततापूर्ण, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले असून, लोकशाहीचा हा महत्त्वाचा टप्पा यशस्वी करण्यासाठी यंत्रणा सजग आहे. शहरातील 70 शाळांमध्ये एकूण 345 मतदान केंद्रांवर आज सकाळी 7:30 ते 5:30 वाजेच्या दरम्यान मतदान पार पडणार आहे. उद्या (शुक्रवारी) एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचार्यांना बुधवारी (14 जानेवारी) सकाळी शहरातील सहा ठिकाणी मतदान साहित्य वितरण केंद्रांवर साहित्याचे वाटप करण्यात आले. अधिकारी व कर्मचार्यांनी साहित्याची तपासणी करून आपापल्या मतदान केंद्रांकडे प्रस्थान केले. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली आहे.
शहरात सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड तैनात करण्यात आले असून, संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचे पथक सतत गस्त घालत आहे. मतदारांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी मतदान केंद्रांवर आरोग्य पथकांची नेमणूक, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीजपुरवठ्याची व्यवस्था तसेच महावितरणचा कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा देण्यात आली असून, मतदानाचा हक्क बजावणे सर्वांसाठी सुलभ व्हावे, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.
लोकशाहीच्या कर्तव्याचे भान ठेवा, आयुक्तांचे आवाहन
निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. ज्या शहरात आपण राहतो, जे शहर आपल्याला घडवते, त्या शहराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मतदान. नव्या वर्षात आपण सर्वजण मतदानाच्या माध्यमातून अहिल्यानगरला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा संकल्प करूया. मतदान केंद्रांवर आम्ही तुमची वाट पाहत आहोत, असे डांगे यांनी सांगितले.
उद्या सत्तेचा कौल
अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज, गुरूवारी मतदान होत असून, उद्या शुक्रवारी एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठीची तयारीही प्रशासनाने पूर्ण केली आहे. आज मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन शीलबंद करून स्ट्राँगरूममध्ये ठेवले जाणार आहे. शहराच्या विकासाची दिशा ठरविणारा हा निकाल कोणाच्या पारड्यात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापैकी एक ओळखपत्राचा पुरावा
मतदानासाठी मतदारांना पासपोर्ट, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, शासकीय छायाचित्र ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँक किंवा टपाल खात्याचे छायाचित्र असलेले पासबुक, अपंगत्वाचा दाखला, मनरेगा जॉब कार्ड, निवृत्ती वेतन कागदपत्रे, लोकप्रतिनिधींचे अधिकृत ओळखपत्र, स्वातंत्र्यसैनिकाचे ओळखपत्र किंवा स्मार्ट कार्ड यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करता येणार आहे.
मतदार जागृतीसाठी उपक्रम
महापालिका निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविणे व नागरिकांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहिर डॉ. अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त सुनील सकट व त्यांच्या कुटुंबीयांनी आगळा-वेगळा उपक्रम राबविला. मतदार ओळखपत्र हातात धरून संपूर्ण कुटुंबीयांनी एकत्रित सेल्फी काढत, ‘आम्ही जाणार मतदानाला, तुम्हीपण चला!’ असा प्रभावी संदेश देत नागरिकांना मतदानासाठी प्रेरित केले.




