Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमृगधारा बरसणार तरी कधी? मान्सून अडखळला तरी कुठे? हवामान विभागाने जारी केला...

मृगधारा बरसणार तरी कधी? मान्सून अडखळला तरी कुठे? हवामान विभागाने जारी केला अंदाज

पुणे | Pune
मान्सूनचा प्रवास सध्या कोकणातच थांबला आहे. तळकोकणापर्यंत आलेला मान्सून अचानक गायब झाला आहे. १५ ते २० जूनपर्यंत मान्सून पुन्हा सक्रिय होईल असे सांगितले जात होते. मात्र अद्याप याचे कोणतेही संकेत सध्या दिसत नाहीये. मान्सून लांबल्यामुळे उष्णतेची लाट आली आहे, त्यामुळे उकाडा वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान ४० शी पार असून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ४२ ते ४४ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. त्यातच आता मान्सूनबाबत हवामान विभागाने ताजा अंदाज दिला आहे.

एल नीनोचा प्रभाव आता हवामानावर स्पष्टपणे दिसू लागला असून, अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा पुढील प्रवास रखडला आहे. सध्या बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही शांत आहेत. उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर एक सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे, त्याचा प्रभाव खूपच मर्यादित आहे. महाराष्ट्रात मान्सून रेंगाळल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

औषध विक्री, रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कफ सिरप घेताना…

राज्यात मान्सूनच्या विलंबामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील ५ दिवस मान्सूनचा पाऊस होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अल निनो आणि आयओडी यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्यास आणखी वेळ लागू शकतो. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पुणे हवामान विभागप्रमुख एस. डी. सानप यांनी मान्सूनबाबत महत्वाची अपडेट देताना सांगितले की, ‘मान्सून लांबला आहे. पुढील ५ दिवस पावसाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवाव्यात. मान्सून सर्वदूर पोहोचेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. तळ कोकणात तसेच कोल्हापूर, सांगलीच्या काही भागात मान्सून एकाच ठिकाणी आहे.’

8 जून रोजी मान्सून तळ कोकणात आला होता. आता मात्र तो पुढे सरकताना दिसत नाही. उत्तरेकडून येणारे जे कोरडे वारे आहे, त्यांचं प्रमाण या ठिकाणी दोन ते तीन किलोमीटरवरच्या अंतरावर वाढलं आहे. आणि मान्सूनच्या प्रवासात ते अडथळा ठरत आहे. त्यामुळेच मान्सून रखडला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

20 जूननंतर हळूहळू पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतात मान्सून येण्यासाठी जुलैचा पहिला किंवा दुसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये केवळ हलक्या सरी कोसळतील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पावसाची शक्यता अत्यंत कमी असून, हा भाग सध्या कोरडाच राहणार आहे.

ताज्या बातम्या

Crime News : लाचखोरीची बारा वर्षे; २०५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासकीय ‘अभय’

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राज्यात भ्रष्टाचाराविरुद्ध 'झिरो टॉलरन्स'च्या गप्पा मारल्या जात असताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau) जाळ्यात अडकलेल्या लाचखोरांना मात्र शासनाचेच मूक अभय...