मुंबई । Mumbai
मुंबईतील रस्त्यांवर जैन मुनींच्या पायी प्रवासासाठी मारण्यात येणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. या मुद्द्यावरून आता मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जैन समाजाला एक नवीन आणि पर्यावरणपूरक प्रस्ताव दिला आहे. “रस्त्यांचे विद्रुपीकरण करणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांपेक्षा जैन समाजाने पर्यावरणपूरक हिरवी झाडे लावावीत,” असा सल्ला देशपांडे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव देताना त्यांनी ‘हिरव्या रंगा’चा उल्लेख करत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनाही मिश्कील चिमटा काढला आहे.
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्युबर प्रसाद वेदपाठक यांनी आज मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत देशपांडे यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली. “जैन मुनींच्या पायाला उन्हाचे चटके बसू नयेत, याबद्दल आम्हालाही पूर्ण काळजी आहे. मात्र, त्यासाठी सार्वजनिक रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या मारणे चुकीचे आहे. त्याऐवजी जैन समाजाने आपल्या भागात मोठ्या प्रमाणावर हिरवी झाडे लावावीत आणि त्या झाडांच्या सावलीतून जैन मुनींनी प्रवास करावा. यामुळे परिसर थंड राहील आणि पर्यावरणाचे रक्षणही होईल,” असा प्रस्ताव देशपांडे यांनी मांडला. तसेच, “हिरव्या झाडांबद्दल जर नितेश राणे यांना काही आक्षेप असेल, तर त्याला आम्ही काही करू शकत नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.
जैन समाजाचे नेते ललित गांधी यांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर उपरोधिक उत्तर देताना देशपांडे म्हणाले, “फक्त सीबीआय का? थेट ‘रॉ’ (RAW) किंवा ‘एनआयए’ (NIA) कडूनच याची चौकशी करा.” पुढे बोलताना त्यांनी सूक्ष्म जीवांच्या रक्षणाच्या तर्कावरही बोट ठेवले. “पांढऱ्या पट्ट्यांमुळे सूक्ष्म जीव मरत नाहीत, असा दावा केला जातो. मग जैन बांधवांनी कोविडची लस घेतली होती की नाही? त्या लशीमुळेही बॅक्टेरिया मरतातच ना? घरात डास आले तर आपण त्यांना मारतो की चावू देतो? त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. आपल्या धर्माचे पालन नक्की करा, पण ते इतरांवर लादू नका,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच आपल्यावर गुन्हे दाखल होण्याचे कोणतेही दडपण नसून, ज्यांनी बेकायदेशीरपणे सार्वजनिक रस्त्यांवर पट्ट्या मारल्या, त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल करा, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.
यावेळी युट्युबर प्रसाद वेदपाठक यांनीही आपली बाजू मांडली. “हा वाद मुळात स्थानिक प्रॉपर्टी आणि सार्वजनिक जागेच्या वापरा संदर्भातील होता. आम्ही येथे अनेक वर्षांपासून सलोख्याने राहत आहोत. या प्रकरणात मला सर्वात आधी मनसेने उघड पाठिंबा दिला, मात्र इतर राजकीय पक्षांनी हवी तशी मदत केली नाही. माझ्यासाठी हा वाद संपला होता, परंतु आता काही संशयास्पद लोक सतत माझ्या पाळतीवर असतात आणि सोशल मीडियावर मला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे,” अशी भीती वेदपाठक यांनी व्यक्त केली.




