अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर शहराच्या आगामी विकासाचा दिशादर्शक ठरणार्या महानगरपालिकेच्या नव्या विकास योजनेचा प्रारूप आराखडा गुरूवारी (30 जुलै) महासभेसमोर सादर करण्यात आला. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा, विस्ताराचा आणि भविष्यातील गरजांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या या आराखड्यात कृषी व हरित पट्ट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करत नागरी विकासासाठी तब्बल 89.32 टक्के क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच शहरातील विविध सार्वजनिक सुविधांसाठी एकूण 519 आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली असून, त्यापैकी 492 जुनी आरक्षणे कायम ठेवत 27 नवीन आरक्षणांचा समावेश करण्यात आला आहे.
महासभेत विकास योजनेसाठी नियुक्त पथकाच्या प्रमुख तथा सहाय्यक संचालक मुजाबीन मुल्ला यांनी प्रारूप आराखड्याचे सादरीकरण केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती त्यांनी सदस्यांसमोर मांडली. सुमारे तीन तास या आराखड्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर महासभा शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली. आज दुपारपासून पुन्हा या आराखड्यावर चर्चा होणार आहे. यापूर्वीच्या मंजूर विकास आराखड्यात एकूण 535 आरक्षणे होती. त्यापैकी गेल्या काही वर्षांत 42 आरक्षणे रद्द झाली असून, महापालिकेला केवळ 29 आरक्षणांचा प्रत्यक्ष विकास करता आला आहे. या पार्श्वभूमीवर नव्या आराखड्यात शहराच्या भविष्यातील गरजांचा विचार करून सुधारित नियोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण नियोजन क्षेत्र 6809.10 हेक्टर इतके असून त्यापैकी 6081.97 हेक्टर म्हणजे 89.32 टक्के क्षेत्र विकसनशील (नागरी) म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे. उर्वरित 727.13 हेक्टर म्हणजे 10.68 टक्के क्षेत्र संरक्षण विभाग, कृषी, जलाशय आणि हरित पट्ट्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. याआधीच्या विकास योजनेत 60 टक्के क्षेत्र नागरी तर 40 टक्के क्षेत्र कृषी व हरित पट्ट्यात होते. आराखड्यात पर्यावरण संवर्धनालाही महत्त्व देण्यात आले आहे. सीना व भिंगार नदीच्या पूररेषा स्पष्टपणे दर्शवून नदी व नाल्यांच्या दोन्ही बाजूंना हरित पट्टे प्रस्तावित करण्यात आले आहेत.
विकास नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी संपूर्ण शहराची आठ सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली आहे. मध्यवर्ती भागातील 5 ते 8 हे सेक्टर बहुतांश विकसित व दाट लोकवस्तीचे असल्याने भविष्यातील विस्तार लक्षात घेऊन शहराच्या परिघावरील 1 ते 4 या सेक्टरमध्ये सर्वाधिक नवीन आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत. नव्या विकास आराखड्यात शहरातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. शहरात 33 स्वतंत्र पार्किंग आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहे.
प्रस्तावित प्रमुख आरक्षणे
खेळाची मैदाने 94, उद्याने व बागा 90, भाजी मार्केट व शॉपिंग सेंटर 65, शैक्षणिक सुविधा 53, बेघरांसाठी घरे व झोपडपट्टी पुनर्वसन 42, महापालिका प्रयोजन 39, आरोग्य सुविधा 33, पार्किंग 33, ग्रंथालये 12, समुदाय व बहुउद्देशीय सभागृहे 11, स्मशानभूमी 10, घनकचरा व्यवस्थापन केंद्रे 8, कब्रस्ताने 8, एएमटी बस स्थानके व ई-चार्जिंग स्टेशन 7, अग्निशमन केंद्रे 4, सांडपाणी प्रक्रिया केंद्रे 4, टाऊन हॉल 3, जलउपसा केंद्रे 2.




