अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर मनपाच्या प्रारूप प्रभाग रचनेची चौकशी केल्याशिवाय अंतिम मान्यता देऊ नये तसेच या प्रभाग रचनेची कठोर पडताळणी करण्यात यावी, या मागणीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे व आयोगाच्या तहसीलदार संगीता वराडे यांनी नगर विकास विभागाच्या कक्ष अधिकार्यांना आदेश देऊन आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. येथील शाकीर शेख यांनी यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
मनपाची प्रभाग रचना राष्ट्रवादी अजित पवार गट व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकरिता सोयीची व सुरक्षित प्रभाग रचना करण्यात आली आहे. ते पूर्णपणे गैर व बेकायदेशीर असून पारदर्शक प्रक्रियेला गालबोट लावणारी आहे व इतर उमेदवारांवर अन्याय करणारी आहे, असा दावा शेख यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. त्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे व नगर विकास विभागाच्या कक्ष अधिकार्यांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिल्याने त्यांच्याकडून या तक्रारीवर काय कार्यवाही होते, याची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान ठाकरे सेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी यासंदर्भात आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावर आयोगाच्या तहसीलदार संगीता वराडे यांनी नगर विकास विभागाच्या उपसचिवांच्या नावे आदेश जारी करून, काळे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आपला वस्तुस्थितीदर्शक सविस्तर अहवाल राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयास तातडीने सादर करण्याचे सांगितले आहे. अहिल्यानगर मनपाची अंतिम प्रभाग रचना विहित मुदतीत जाहीर न करता निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व निःपक्षता पायदळी तुडवली गेल्याची तक्रार काळे यांनी केली होती व जुनी प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवण्याची मागणी केली होती. आता या तक्रारीच्या अनुषंगाने नगरविकास विभागाच्या उपसचिवांना अहवाल राज्य निवडणूक आयोगाला द्यावा लागणार आहे.





