अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील मुली, युवती व महिला आणि बालकांची सुरक्षा, त्यांना आवश्यक सुविधा व त्यांची सुरक्षा यांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाही मनपा महिला व बालकल्याण समितीच्या नव्या सभापती अजित पवार राष्ट्रवादीच्या नगरसेविका दीपाली बारस्कर व उपसभापती भाजपच्या नगरसेविका वर्षा सानप यांनी मंगळवारी (10 मार्च) दिली.
बारस्कर व सानप यांची सभापती व उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी महिला व बालकल्याण समितीद्वारे शहरात करणार असलेल्या विकास कामांची तसेच राबवण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महिला व बालकांची सुदृढता व त्यांची सुरक्षा तसेच त्यांना आवश्यक सुविधा या त्रिसूत्रीवर काम करताना बाजारपेठेत महिलांना स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष, महिला व युवतींसाठी स्वसंरक्षण मार्गदर्शन, चारही प्रभाग समित्यांमध्ये बालकांसाठी विशेष आरोग्य केंद्र सुरू करण्यास प्राधान्य राहील, असे स्पष्ट करून सभापती दीपाली बारस्कर म्हणाल्या, माझ्या प्रभाग 1मध्ये मी दोन अंगणवाड्या सुरू केल्या आहेत.
याच पद्धतीने प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत मनपाच्या अंगणवाड्या सुरू करून तेथे येणार्या बालकांना पोषक आहार, त्यांना खेळाचे साहित्य, त्यांची आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन तसेच प्रत्येक प्रभागात महिलांसाठी खुली व्यायामशाळा व जॉगींग ट्रॅक, निःशुल्क योगा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनपा बजेटमध्ये महिला व बालकल्याण समितीसाठी 5 टक्के राखीव निधी असतो. तो निधी महिला व बालकल्याणासाठीच खर्च होण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगून बारस्कर म्हणाल्या, स्वतंत्र निधी असला तरी तो वेळेवर मिळत नाही व त्यातून कामे होत नाही, हे मी या समितीची मागे सदस्य असताना अनुभवले आहे.
मात्र, आता सभापती पदाच्या माध्यमातून निधी उपलब्धता व त्याचा योग्य विनियोग याला प्राधान्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या शालेय मुलींसाठी सुरू असलेली कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावी राबवण्यासाठी मनपाद्वारे जनजागृती केली जाईल, या लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
महिला शौर्यगाथा सांगणार : सानप
दिल्ली येथील गुरुजी दिनेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर शहरात जगराणी हा विशेष उपक्रम राबवणार असल्याचे उपसभापती वर्षा सानप यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, झांशीची राणी लक्ष्मीबाई व अन्य राष्ट्रीय स्तरावरील महिलांचे जीवन चरित्र कथा रुपात मुली, युवती व महिलांना सांगितले जाणार आहे. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याने भारतीय संस्कृती परंपरा व महिलांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यास प्राधान्य देणार असल्याचे सानप यांनी सांगितले.





