Wednesday, November 18, 2026
HomeनगरAMC : पुतळा उभारणी रखडली, न्यायालयीन विभागाची पोलखोल!

AMC : पुतळा उभारणी रखडली, न्यायालयीन विभागाची पोलखोल!

मनपा स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांकडून प्रशासनाची कोंडी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणीच्या कामासाठी माळीवाडा वेस पाडण्याच्या कामास स्थगिती येते, महापालिकेच्या प्रारूप आराखड्यालाही न्यायालयात अडथळे निर्माण होतात. शहरातील महत्त्वाच्या विषयांवर न्यायालयीन लढाई सुरू असताना महापालिकेचा न्यायालयीन विभाग नेमके काय काम करतो? पॅनलवरील वकील न्यायालयात महापालिकेची बाजू सक्षमपणे मांडतात का? पुतळा उभारणीला विरोध होणार, याची पूर्वकल्पना असतानाही महापालिकेने उच्च न्यायालयात कॅव्हेट का दाखल केले नाही? असे सवाल उपस्थित करत नगरसेवकांनी स्थायी समितीच्या सभेत प्रशासन आणि न्यायालयीन विभागाला धारेवर धरले.

- Advertisement -

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती सुभाष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सदस्यांसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीलाच माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा उभारणीचा विषय चांगलाच गाजला. पुतळा उभारणीचे काम का रखडले? न्यायालयाने नेमकी कोणत्या कारणास्तव स्थगिती दिली? याबाबत न्यायालयीन कामकाज पाहणार्‍या अधिकार्‍यांनी सभेत सविस्तर माहिती द्यावी. संबंधित अधिकारी उपस्थित नसतील तर सभा पुढे चालू देणार नाही, अशी भूमिका नगरसेवक निखील वारे यांनी घेतली. मात्र, न्यायालयीन कामकाज पाहणारे अधिकारी सभेला उपस्थित नसल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला.

महापालिका पॅनलवरील वकिलांसाठी लाखो रूपये खर्च करते. मात्र, न्यायालयात महापालिकेची बाजू सक्षमपणे मांडली जाते का, हा प्रश्न आहे. सभापती लोंढे यांनी न्यायालयीन विभागाच्या कामकाजाचा लेखाजोखा मागितला. मात्र, या प्रश्नांवर न्यायालयीन विभागाचे अधिकारी निरूत्तर झाले. ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’, अशी अवस्था या विभागाची झाली आहे, अशी संतप्त टिप्पणी सभापती लोंढे यांनी केली. महिलांसाठी ओपन जिम उभारण्याचा प्रस्ताव सभेत मांडण्यात आला. हा उपक्रम कौतुकास्पद असला तरी जिमचे साहित्य बसविल्यानंतर त्याची देखभाल आणि दुरूस्ती कोण करणार, याची जबाबदारी आधीच निश्चित करावी, अशी मागणी केली.

खासगी टँकरव्दारे पाणीपुरवठा आणि मोकाट कुत्र्यांसाठी निवारा गृह उभारण्यासंदर्भातील दोन विषय स्थगित ठेवण्यात आले. पाण्याची नासाडी करणार्‍यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सदस्यांनी केली. पाणी प्रश्नांसंदर्भात नियोजनासाठी आज (बुधवार) सकाळी 11 वाजता सर्व नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पाणी टँकरचालकांची तपासणी करण्यासाठी महापालिकेने अल्कोमीटर खरेदी करावेत. चालकांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच त्यांना टँकर चालविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

चौकाचौकांत सीसीटीव्ही बसविण्याची मागणी
शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रमुख चौक आणि महत्त्वाच्या ठिकाणी महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नगरसेवकांनी केली. यावर सभापती लोंढे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांना निवेदन देऊन निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

क्यूआर कोडमध्ये घोटाळा
घनकचरा विभागामार्फत शहरातील प्रत्येक घराला क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. घंटागाडीचे लोकेशन, सफाई कर्मचारी आणि घंटागाडी चालकांची उपस्थिती व कामकाज यावर देखरेख ठेवण्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात क्यूआर कोड स्कॅनिंगचा अपेक्षित वापर होत नसल्याचा आरोप वारे यांनी केला. या यंत्रणेत मोठा घोटाळा होत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : टंचाईचे संकट; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला दोन महिने बंदी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे चारा साठा कमी होत असल्याने पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणारा...