अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडीतील पत्रकार चौकात सारडा महाविद्यालयालगतच्या अंतिम भूखंड क्रमांक 43-अच्या सुधारित मोजणी नकाशातून दोन्ही बाजूंचे नैसर्गिक नाले गायब झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शाकीर शेख यांनी जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख यांच्याकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून, नगर भूमापन कार्यालयाचे उपअधीक्षक जितेंद्र भिंगारदिवे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून स्पष्ट निष्कर्षांसह अहवाल सादर करण्याचे आदेश भूमी अभिलेख उपसंचालक, नाशिक प्रदेश यांना देण्यात आले आहेत.
मौजे सावेडीच्या मूळ गाव नकाशामध्ये जुना सर्वे क्रमांक 161 मधील अंतिम भूखंड क्रमांक 43-अच्या दोन्ही बाजूंनी नैसर्गिक नाले स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यासोबत प्रसिध्द करण्यात आलेल्या विद्यमान जमीन वापर नकाशात देखील संबंधित परिसरातील नाले आणि नैसर्गिक जलप्रवाह दाखविण्यात आले आहेत. हा नकाशा अंतिम विकास आराखड्याचा नसून, प्रारूप विकास आराखड्याच्या प्रक्रियेत शहरातील विद्यमान जमीन वापर आणि भौगोलिक स्थिती दर्शविणारा नकाशा आहे. मात्र, नगर भूमापन कार्यालयाने अंतिम भूखंड क्रमांक 43-असाठी तयार केलेल्या सुधारित मोजणी नकाशामध्ये भूखंडाच्या दोन्ही बाजूंच्या नैसर्गिक नाल्यांचा स्पष्ट उल्लेख अथवा सीमांकन करण्यात आलेले नाही.
त्यामुळे मूळ गाव नकाशा आणि विद्यमान जमीन वापर नकाशात दिसणारे नाले सुधारित मोजणी नकाशातून नेमके कसे गायब झाले, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित भूखंडावर सध्या सुमारे 45 मीटर उंचीच्या विशेष इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सुधारित मोजणी नकाशामध्ये दोन्ही बाजूंच्या नाल्यांची नोंद न केल्यामुळे प्रत्येक नाल्यापासून नियमानुसार आवश्यक असलेले नऊ-नऊ मीटर अंतर न सोडताच बांधकाम परवानगी देण्यात आल्याचा गंभीर आरोप शेख यांनी तक्रारीत केला आहे.




