अकोले |प्रतिनिधी| Akole
प्रवरा नदीपात्रात दोघे वाहून गेल्याची घटना गुरुवारी (दि.22) दुपारी तालुक्यातील सुगाव बुद्रुक शिवारात घडली. या घटनेत एकाचा बुडून मृत्यू झाला असून दुसर्याचा ठावठिकाणा रात्री उशिरापर्यंत लागला नव्हता. बुडणार्या तरुणाला वाचविण्यासाठी गेलेला एक तरुण या घटनेतून बालंबाल बचावला. निळवंडे धरणातून सध्या शेतीच्या पाण्याचे आवर्तन सुरू असून गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रोकडोबा जवळील प्रवरा नदीपात्रात ऊन जास्त असल्यामुळे दोघे पोहायला गेले होते. त्यातील बाळू अशोक शिंदे (वय 38) याचा दुदैवी मृत्यू झाला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आकाश पोपट पथवे (वय 25) याचा शोध सुरु आहे.
तर सूरज पोपट पथवे (वय 21) हा तरुण या घटनेतून दैव बलवत्तर म्हणून बचावला. बाळू शिंदे पोहायला गेला तेव्हा तिथे नदीत भोवरा होता त्यात तो अडकला. त्याला वाचविण्यासाठी आकाश पथवे याने नदीत उडी घेतली. तोही त्यात बुडाला मग त्यांना वाचविण्यासाठी आकाशचा भाऊ सूरज याने पाण्यात उडी घेतली. बाजूलाच काही लोक हे पाहत होते. त्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेला घटनेची माहिती दिली. पोलीस पाटील राजेंद्र शिंदे यांनी तातडीने ही घटना महसूल आणि पोलीस यंत्रणेला कळविली.त्यानंतर तातडीने प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी दखल होवून मदतकार्य सुरू झाले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बाळू शिंदे याचा मृतदेह सुगाव गावच्या दशक्रिया विधी सभामंडपाजवळ आढळून आला. आकाश पथवे याचा मात्र सायंकाळपर्यंत शोध लागलेला नव्हता. मृत शिंदे याच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार किसन लोहरे, मंडलाधिकारी श्री. नागरे, तलाठी श्री. तिकडे, पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी वाडेकर, सुनील गवारी, प्रशांत सूर्यवंशी, होमगार्ड सोमनाथ उगले, दीपक किर्वे, कोतवाल गौतम वाकचौरे आदी प्रवरा नदीच्या काठावर ठाण मांडून बसले असून आकाश पथवे याचा कसून शोध घेत आहेत.
दोन वर्षांपूर्वीच्या घटनेची झाली आठवण
दोन वर्षापूर्वी सुगाव बुद्रुक शिवारात दोन युवक बुडाल्याची घटना घडली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. पथकाचे दोन जवान एका स्थानिक युवकासह प्रवरा नदीपात्रात उतरले होते. यावेळी त्यांची होडी शोध घेत असताना भोवर्यात सापडून उलटली. या घटनेत होडीमधील तिघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला होता. आजच्या घटनेमुळे अनेकांना मागील घटनेची आठवण झाली.




