अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आगामी अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या गुरूवारी (20 नोव्हेंबर) जाहीर करण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह संकेतस्थळावर या याद्या नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.
महानगरपालिका क्षेत्रासाठी मतदार याद्या तयार करताना 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्यांचा आधार घेण्यात आला आहे. संबंधित मतदार यादीचे प्रभाग क्रमांक 1 ते 17 प्रमाणे विभाजन करीत प्रभागनिहाय प्रारूप यादी छापून अधिप्रमाणित करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर फोटो विरहित मतदार यादी नागरिकांसाठी विनामूल्य पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर फोटोसह प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या महानगरपालिकेत प्रति पृष्ठ 2 रूपये दराने विक्रीस आहेत. मतदार अथवा तक्रारदारांनी याद्यांमध्ये कोणतेही दोष, चूक किंवा विसंगती आढळल्यास 20 ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत लेखी हरकती व सूचना दाखल करता येतील.
यासाठी पुढील कार्यालयांमध्ये नमुना अ (मतदारांसाठी) आणि नमुना ब (तक्रारदारांसाठी) मध्ये अर्ज स्वीकारले जातील: मुख्य प्रशासकीय कार्यालय (नवीन प्रशासकीय इमारत), प्रभाग समिती कार्यालय क्र. 1, सावेडी, प्रभाग समिती कार्यालय क्र. 2, शहर, प्रभाग समिती कार्यालय क्र. 3, झेंडीगेट, प्रभाग समिती कार्यालय क्र. 4, बुरूडगाव. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नमुना ‘अ’ व ‘ब’ हे दोन्ही नमुने महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 1 जुलै 2025 हा दिनांक आधार मानून जेवढी विधानसभा मतदार यादी अस्तित्वात होती, तीच यादी प्रभागनिहाय विभागून महानगरपालिका निवडणुकीसाठी स्वीकारण्यात आली आहे. त्यामध्ये स्वतंत्रपणे कोणतीही वाढ-कपात करण्याचा अधिकार महानगरपालिकेला किंवा निवडणूक आयोगास नाही.
कोणत्या प्रकारच्या दुरूस्त्या करता येणार ?
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार प्रारूप महानगरपालिका मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करणे किंवा विद्यमान नावे वगळणे यास अधिकार्यांना अधिकार नाहीत. तथापि काही चुका दुरूस्त करता येतील यामध्ये लेखनिकांच्या चुकांमुळे झालेल्या तांत्रिक त्रुटी, एका प्रभागातील मतदार चुकून दुसर्या प्रभागात समाविष्ट झाल्यास, विधानसभा मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिका प्रभाग यादीत नाव वगळले असल्यास त्या त्रुटीची दुरूस्ती, मृत व्यक्तींची नावे आढळल्यास त्याबाबत योग्य नोंद या चुकांचा समावेश आहे.
मतदारांनी आपली नावे, प्रभाग आणि तपशील नीट तपासून आवश्यक त्या हरकती किंवा सूचना निश्चित मुदतीत दाखल कराव्यात, ज्यामुळे अधिक अचूक व पारदर्शक मतदार यादी तयार होण्यास मदत होईल.
– यशवंत डांगे, आयुक्त, महानगरपालिका.





