Thursday, November 26, 2026
Homeमहाराष्ट्रDattatray Bharne : शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची जोड देत शेतीपुरक व्यवसायाला प्राधान्य द्यावे -...

Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची जोड देत शेतीपुरक व्यवसायाला प्राधान्य द्यावे – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

नाशिक | Nashik

नाशिक जिल्हा (Nashik District) कृषी क्षेत्रात प्रगत असून शेतीला आधुनिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनक्षम व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे. बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या दुष्काळसदृश (Drought) परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना शासनामार्फत आवश्यक ती मदत देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायांनाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

- Advertisement -

माडसांगवी (Madsangvi) येथे आयोजित १९ व्या आंतरराष्ट्रीय ‘कृषीथॉन २०२६’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Minister Dattatray Bharne) यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, आमदार नितीन पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासह संजय न्याहारकर साहील न्याहारकर, अश्विनी न्याहारकर,नितीन मराठे व कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि शेतकरी उपस्थित होते.

मंत्री भरणे म्हणाले की, बदलत्या हवामानाचा (Weather Related) शेतीवर परिणाम होत असून, अशा परिस्थितीत पीक नियोजन, जलसंधारण, पाण्याचा काटेकोर वापर आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी करण्यासह उत्पादकता वाढविण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नव्या प्रयोगांची माहिती घेऊन त्यांचा प्रत्यक्ष शेतीत उपयोग करावा. पशुपालन, दुग्धव्यवसाय यांसारख्या शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करावेत.

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन आवश्यक ती मदत करीत असून या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. या प्रदर्शनातून शेतीतील (Farm) आव्हाने, आधुनिक उपाययोजना आणि भविष्यातील संधी यांची माहिती मिळणार आहे. कृषीथॉन प्रदर्शन शेतकरी, कृषी उद्योजक आणि अभ्यासकांसाठी आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि शेतीतील नव्या संधींचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.

आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) यांनी कृषीथॉन २०२६ प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नवीन शेती पद्धती आणि कृषी क्षेत्रातील नव्या संधींची माहिती मिळत असल्याचे सांगितले. कृषिमंत्री भरणे यांनी कृषीथॉन २०२६ प्रदर्शनाला भेट देत विविध कंपन्या व संस्थांच्या स्टॉलची पाहणी केली. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन कृषी यंत्रसामग्री, शेतीसाठी उपयुक्त उपकरणे तसेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कृषी उत्पादनांची माहिती घेतली. कृषीथॉन विशेष सन्मान अंतर्गत मंत्री भरणे यांच्या हस्ते श्रीराम ढोकरे यांना द्राक्षमहर्षी, शकुंतला वाघ यांना कर्मयोगिनी, नागराज देवरे यांना दुग्धमहर्षी, तर बापूसाहेब पिंगळे यांना कृषी उद्योग रत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमास आमदार दिलीप बोरसे यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ATM मध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटा जमा...

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road निफाड (Niphad) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधील कॅश डिपॉझिट मशीनमध्ये (सीडीएम) ५०० रुपये दराच्या तब्बल ४७ बनावट नोटा...