मुंबई | Mumbai
पुण्यातील (Pune) शिवाजीनगर (Shivajinagar) कोर्टाच्या बाहेर बुधवारी (दि.२५) रोजी एका तरुणावर गोळीबार करत कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. यामुळे पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यावर माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधत मोठी मागणी केली.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजितदादा असताना पुण्यात अशी गुन्हेगारी कधीच नव्हती, असे म्हणत पुण्याचे पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावे अशी मागणी केली होती. त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बोलताना जर पुण्याचे पालकत्व मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं तर पुण्याचे (Pune) वाटोळं होईल, असा दावा केला आहे. तसेच अजितदादांची जागा कुणीचं घेऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटले.
पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून राजकीय वाद
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, “कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची आणि गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांची आहे. अजितदादांचा प्रशासनावर वचक व दरारा होता; त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. सुनेत्रा पवार यांच्या राजकारणाची नुकतीच सुरुवात असून त्यांना पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील असे वाटत नाही; त्यामुळे त्यांना ताकद द्यावी किंवा पुण्याला कडक पालकमंत्री द्यावा,” असे त्यांनी म्हटले आहे.
शरद पवार रुग्णालयात, प्रकृती स्थिर; दोन दिवस तपासण्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची आज सकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांची बैठक सुरू असतानाच शरद पवार यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नेत्यांना आवाहन आणि वेळेचे भान
दरम्यान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी डॉक्टरांची भेट घेतली असून साहेबांची तब्येत ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पुढील दोन दिवस इतर काही वैद्यकीय तपासण्यांसाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. तर उपचार सुरू असताना रुग्णाला संसर्गाचा धोका संभवतो, त्यामुळे कोणत्याही नेत्याने भेटून संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन रोहित पवार यांनी केले. तसेच, भेटायला येणाऱ्यांमुळे अनेकदा शरद पवार यांना वेळेचे भान राहत नाही आणि जेवण वेळेवर न झाल्याने प्रकृतीवर परिणाम होतो, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांवर टीका आणि पोलीस आयुक्तांच्या बदलीची मागणी
पुण्यातील गुन्हेगारी घटना हे गृहखात्याचे अपयश असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे पालकत्व घेऊ नये, अन्यथा पुण्याचे वाटोळे होईल, असा दावा केला. तसेच, पुणे पोलीस आयुक्त कोणाचेही न ऐकता केवळ देवेंद्र फडणवीसांचे ऐकतात, असा आरोप करत आयुक्तपदी कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणीही त्यांनी केली.




